सातारा : शासनाच्या क्रीडा संचालनालयाकडून, सातारा शहरातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये सिंन्थेटिक ट्रॅक करीता आणि क्रीडा साहित्यासह इतर बाबींसाठी रुपये 15 कोटी रुपयांच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू स्टेडियम येथे अदयावत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिन्थेटीक ट्रॅक लवकरच अस्तित्वात येवून ॲथेलेट प्रकारातील खेळाडुंना चांगली सुविधा उपलब्ध होईल अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती नमुद करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यानी पुढे नमुद केले आहे की, छत्रपती शाहू क्रीडा संकुलाची जागा पूर्वी राजघराण्याच्या मालकीची होती. तथापि सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांना चालना मिळावी, क्रीडापटुंना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून सदरची जागा पूर्वीच सातारा नगरपरिषदेला देण्यात आली होती. तेथे पूर्वी टेबलटेनिस, बॅडमिंटन चे इनडोअर गेम हॉलसह टुमदार स्टेडियमची इमारत अस्तित्वात होती. त्याची देखभाल नगरपरिषदेतर्फे करण्यात येत होती. तथापि जिल्हयाचे ठिकाणी क्रीडा संकुल असावे या राज्याच्या धोरणालाप्रतिसाद देत सातारा नगरपरिषदेच्या मालकीचे स्टेडियम आणि जागा मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल यांचेकडे नगरपरिषदेकडून वर्ग करण्यात आल्यावर, त्याठिकाणी स्टेडियमच्या पश्चिम आणि दक्षिण बाजुला स्टेडियम आणि गाळे उभारण्यात आले. तसेच हॉलिबॉल ग्राऊंड, पोहण्याचा तलाव अश्या अन्य काही क्रीडा सुविधा निर्माण करण्यात आल्या. परंतु सिंन्थेटीक ट्रॅकची पूर्तता होवु शकली नाही. साता-यातील स्व. नंदा जाधव, ललिता बाबर अश्या अनेक धावपटुंनी साता-याचे नांव जगाच्या नकाशावर उमटवले तथापि क्रीडा संकुलात सिन्थेटीक ट्रॅक नसल्याने, धावपटुंच्या सराव कारकिर्दीवर मर्यादा येत होत्या.
त्यामुळेच आम्ही छत्रपती शाहू स्टेडियम येथे सिंन्थेटिक ट्रॅक निर्माण केला पाहीजे अशी वेळोवळी आग्रही भुमिका घेतली. राज्याचे क्रीडा मंत्री, ना.दत्तात्रय भरणे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच राज्य क्रीडा संकुल समितीकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. जिल्हा क्रीडा संकुलाचे सचिव यांचेकडेही योग्य तो प्रस्ताव पाठविण्यासाठी आम्ही सातत्याने सूचना केल्या, या सर्वांचा परिणाम म्हणून आज सातारा जिल्हा क्रीडा संकुल समितीला पूर्वी मंजूर असलेल्या 8 कोटीच्या प्रशासकीय मान्यतेसह रुपये 15 कोटी अनुदान रक्कमेची वाढ करण्यात येवून एकूण 23 कोटी रुपयांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 400 मिटरच्या सिन्थेटिक ट्रॅकची बांधणी करण्यात येणार आहे.
सिन्थेटिक ट्रॅक मुळे निश्चितच ॲथलेट मधील विविध क्रीडा प्रकाराचे सरावासाठी धावपटुंना एक चांगली सुविधा साता-यामध्ये निर्माण होणार आहे., त्याचा उपयोग युवा धावपटुंना लवकरच करता येईल याचे समाधान आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.