सातारा शहरात शालेय पोषण आहार संघटनेचा मोर्चा

सातारा : शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्यावतीने (आयटक) सातारा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेसमोर थकीत मानधनासाठी भीक मॉंगो आंदोलन करण्यात येणार होते. पण मोर्चाद्वारे विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासन तसेच झेडपीचे सीईओ याशनी नागराजन यांना देण्यात आले. हे आंदोलन पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन सुरु करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांचे मानधन हे चार महिन्यांपासून रोखून ठेवले आहे. हे मानधन तात्काळ देण्याची गरज आहे. याबाबत अनेकदा शिक्षण विभागात जावून वारंवार विनंती करण्यात आली आहे. परंतु अद्यापही त्याबाबतची पुर्तता करण्यात आली नाही. म्हणून बुधवार, दि. 8 जानेवारी रोजी नियोजित भिक मॉंगो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण पोवईनाका, जिल्हाधिकारी येथून जिल्हा परिषद येथे विविध घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.

गेल्या चार महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही, ते तात्काळ द्यावे, किमान वेतन 24 हजार रुपये मिळावे, वेतन लागू होईपर्यंत 10 हजार रुपये मानधन मिळावे, बारा महिने सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे ते मिळावे. सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा. नियम सोडून अन्यायाने कमी केलेल्या शा. पो. आ. कर्मचार्‍यांना कमी केलेल्या कालावधीचे मानधन देवून पुन्हा कामावर घ्यावे आदी मागण्यांचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर शालेय पोषण आहार अधिवेशन समिती सहसेक्रेटरी विठ्ठल सुळे, उपाध्यक्ष नदीम पठाण, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पवार, कविता उमाप आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.



मागील बातमी
माझी वसुंधरा 5.0 योजनेस पाटण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
पुढील बातमी
अनंत इंग्लिश स्कूलमध्ये प्लास्टिक निर्मूलन उपक्रम

संबंधित बातम्या