मुंबई : मुंबई टेक वीक २०२५ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. टेक आंत्रप्रेन्योअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) सोबत झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी मुंबईच्या तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली.
मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईला ‘आशियाचा AI सँडबॉक्स’ म्हणून जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ दृष्टिकोनाला गती देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व उद्योजक, संशोधक आणि तंत्रज्ञांना MTW 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल, श्री. अश्विनी वैष्णव, आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
याशिवाय, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, उद्योगपती आकाश अंबानी तसेच गुगल डिपमाईंड, ॲन्थ्रोपिक, स्केल, कृत्रिम, सर्वम, मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि सेल्सफोर्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचे ‘एआय’ क्षेत्रातील तज्ज्ञ देखील उपस्थित राहणार आहेत.
मुंबईची टेक इकोसिस्टम आणि TEAM ची भूमिका
TEAM ही मुंबईतील तंत्रज्ञान उद्योजकांची अग्रगण्य स्वायत्त संघटना आहे. या संघटनेमध्ये 65 हून अधिक स्टार्टअप आणि युनिकॉर्न कंपन्यांचे संस्थापक असून, त्यांची एकत्रित बाजारपेठेतील किंमत $60 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
TEAM च्या गव्हर्निंग काउंसिलमध्ये ड्रिम11 चे सह-संस्थापक हर्श जैन, हापटिकचे सह-संस्थापक आकृत वैष, द गुड ग्लॅम ग्रुपच्या नय्या साग्गी, लॉगीनेक्स्टचे ध्रुविल संघवी आणि GoQii चे विशाल गोंडल यांसारखे नामवंत उद्योजक समाविष्ट आहेत.
मुंबई टेक वीक 2025 : भारताला जागतिक ‘एआय’ स्पर्धेत आघाडीवर आणण्याचा प्रयत्न
या महोत्सवाच्या माध्यमातून ‘एआय’ तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर, स्टार्टअप्ससाठी नवीन संधी, भारतीय ‘एआय’ संशोधन, आणि उद्योजकांसाठी गुंतवणूक व नोकऱ्या उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. देश-विदेशातील तंत्रज्ञ, संशोधक आणि गुंतवणूकदारांसाठी हा कार्यक्रम या क्षेत्रातील संधींचे दार उघडणारा ठरणार आहे.