वाठार स्टेशन : सातारा-लोणंद रस्त्यावर वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथे सोमवारी रात्री दुचाकी व जीप यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. सागर संपत चव्हाण (वय 31, रा.वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सातारच्या बाजूने येणारी दुचाकी (क्रमांक 11- -8539) आणि लोणंद बाजूकडून येणारी महिंद्रा कंपनीची झायलो गाडी (क्रमांक 04--9495)यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार सागर चव्हाण हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नेण्यास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्याचबरोबर रात्रीची वेळ असल्याने खाजगी वाहन सुद्धा लवकर उपलब्ध झाले नाही. पिकअप जीपमधून जखमीला सातारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. वाठार स्टेशन पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाला आहे. या घटनेची फिर्याद मिथुन चव्हाण याने वाठार स्टेशन पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.