सातारा : सातारा वन विभागाच्या फिरत्या पथकाने पिलाणी, ता. सातारा आणि आंबेघर, ता. जावळी येथे केलेल्या कारवाईमध्ये अवैध लाकूड वाहतूकप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये दोन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहने आणि लाकूडफाटा जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी संजय वाघमोडे व सातारचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, वनपाल डी. डी. बोडके, रामेश्वर घुले, अश्विनी नागवे, प्रकाश वाघ, दिनेश नेहरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पिलाणी येथे सागाच्या लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला शनिवारी (दि. 11) सायंकाळी 7 वाजता मिळाली. त्यानुसार या पथकाने उंब्रजच्या दिशेने निघालेले वाहन अडवून, तपासणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना लाकूड आढळले. याप्रकरणी ऋषीकेश सुरेश कदम (वय 21, रा. उंब्रज, ता. कराड), आमिर आप्पा सुतार (वय 60, रा. काळोशी, ता. कराड) यांना ताब्यात घेऊन, त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी कारवाई महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर आंबेघर परिसरात करण्यात आली. वरोशी-केळघर-आंबेघरमार्गे मेढ्याच्या दिशेने निघालेले महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप वाहन वन विभागाच्या पथकाने आंबेघर येथे अडवून, तपासणी केली असता, त्यामध्ये खैराचे लाकूड आढळले. या लाकडाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी मारुती निवृत्ती भालेराव (वय 38, रा. घोडे, ता. मुळशी, जि. पुणे), शिवराम लक्ष्मण गोळे (वय 50, रा. वरोशी, ता. जावळी) आणि राजू भुर्या वाघमारे (वय 40, रा. कोथळी सोंडेवाडी, ता. महाड) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.