तृणधान्य महोत्सावात ग्राहकांनी केली 22 लाखांची खरेदी

by Team Satara Today | published on : 28 March 2025


सातारा : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा कार्यालयामार्फत २१ ते २३ मार्च २०२५  कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सावाचे अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र सातारा येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सव कालावधीत शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाची सुमारे 22 लाख रुपयांची ग्राहकांनी खेरदी केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

शेतक-यांनी शेतीमाल पिकवण्याबरोबर विक्री कौशल्य विकसीत करून थेट माल विक्रीद्वारे जास्तीत जास्त नफा मिळविणे तसेच ग्राहकांना गुणवत्तापुर्ण माल मिळणे व पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्व माहित होण्यासाठी या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सावामध्ये एकूण ६१ स्टॉलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण शेतमाल जसे माण, खंडाळाची देशी बाजरी, सातारा, खटावची देशी ज्वारी, कराडची नाचणी, जावळी, पाटणचा इंद्रायणी तांदुळ, खटावचा हिरवा मुग, कोरेगावचा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, वाई तालुक्यातील हळद तसेच फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळे तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ इ. वैशिष्ट्य पूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता आले या माध्यमातून  ३ दिवसांमध्ये २२ लाखापर्यंत विविध शेतमालाची विक्री झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फुटक्या तलावाचे होणार सुशोभीकरण
पुढील बातमी
कोल्हापूर कोर्टात हाणामारी

संबंधित बातम्या