टपाल घोटाळा प्रकरणात खातेधारकांचे क्लेम चर्चेच्या फेर्‍यात

फसवणूक झालेल्या खातेदारांची वणवण सुरूच; कोर्टाच्या पायर्‍या झिजवण्याची आली वेळ

by Team Satara Today | published on : 04 July 2025


सातारा : सातारा टपाल कार्यालयाच्या अल्पबचत खात्यांच्या फसवणुकीचा घोळ अद्यापही मिटलेला नाही. तब्बल 15 महिन्यानंतरही दीडशे खातेधारकांच्या रकमांचे क्लेम टपाल विभागाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयामध्ये फाईल बंद अवस्थेत पडून आहेत. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर या खातेदारांना पोलिसांनी कारवाईचा सज्जड दम भरल्याने त्यांचे आंदोलन बारगळले. पोलिसांच्या बंदोबस्तात प्रभारी अधिकार्‍यांशी चर्चा करताना तुमचे क्लेम पाठवण्यात आले आहेत, अशी सरकारी छापाची उत्तरे त्यांना ऐकायला मिळाली. सातारा जिल्हा हा कॅबिनेट मंत्र्यांचा जिल्हा असताना तब्बल 48 कोटीच्या फसवणूक प्रकरणात पोस्टाच्या दीडशे खातेदारांना न्याय मिळेनासा झाला आहे. मार्च 2024 मध्ये कल्याणी गांधारी नावाच्या अल्पबचत एजंट महिलेने सातारा शहरातील दीडशे खातेधारकांचे पैसे गोळा करून ते त्यांच्या खात्यात न भरता परस्पर वैयक्तिक फायद्यासाठी वापरले. यामध्ये पोस्टातील अधिकार्‍यांची या महिलेला फूस होती, असा खातेधारकांचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये थेट केंद्रीय गुप्तचर खात्याने लक्ष घातले तरी अद्याप त्या महिलेवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा धक्कादायक दावा खातेदारांनी केला आहे. सुमारे दीडशे जणांचे क्लेम पुणे येथील टपाल विभागाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयामध्ये फाईल बंद आहेत. खातेधारकांनी दोन दिवसांपूर्वी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र सातारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन कायदेशीर मार्गाने चर्चा करण्याचे आवाहन केले व कारवाईचा इशारा दिला. खातेधारकांनी प्रभारी अधिकार्‍यांशी चर्चा केली असता आम्ही आपले क्लेम पाठवले आहेत. या पलीकडे त्यांनी कोणतेही थेट आश्वासन दिले नाही. गेले पंधरा महिने या खातेधारकांची आपल्या पैशासाठी वणवण सुरू आहे. ना पोलीस यंत्रणा, ना पालकमंत्री, ना जिल्हा प्रशासन कोणत्याच विभागाकडून त्यांना आश्वासक दाद मिळेनाशी झाली आहे. याबाबत टपाल विभागाचे अधीक्षक अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे खातेधारकांनी रीतसर कायदेशीर दाद मागण्याची आता तयारी सुरू केली आहे. आधीच आयुष्यभराची पुंजी वाया गेल्याची भावना झालेली असताना पुन्हा कायदेशीर दाद मागण्यासाठी खिशाला चाट देण्याची वेळ खातेधारकांवर आल्याने सर्वांमध्ये सार्वत्रिक संतापाची भावना आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडच्या विवाह सोहळ्यात निखळ राजकीय संस्कृतीचे दर्शन
पुढील बातमी
शाहूनगरवासीयांना हवेय कास तलावाचे पाणी

संबंधित बातम्या