वाई : वाई शहरातील दोन जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले असून याबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन होत आहे.
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगापूरी येथील टोळीचा प्रमुख यश उर्फ वशा अभिजीत सोंडकर (वय १९) आणि टोळीतील सदस्य मेघराज उर्फ सोन्या संतोष मोरे (वय २० दोघेही रा. गंगापुरी ता. वाई) यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, दुखापत पोचवणे, शिवीगाळ दमदाटी करणे यासारखे दखलपात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांनी त्यांच्या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्या, त्यांच्या टोळीवर कायद्याचा कोणताच धाक राहिला नसल्याने वाई तालुका परिसरातील लोकांना या टोळीचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत होता.
अशा टोळींवर कायद्याचा वचक राहावा यासाठी सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या दोघांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपारीचे आदेश केले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आगामी निवडणूक काळात सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध हद्दपारी, मोक्का,एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे,शिवाजी भिसे, पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन कदम, निलेश देशमुख यांनी योग्य पुरावा सादर केला.