सातारा : अल्पवयीन मुलांना मारहाण करुन मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी अनिल आदिनाथ शिंदे आणि त्याच्या पत्नी विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित अनिल आदिनाथ शिंदे याने यातील अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्राला शनीनगर येथील आपल्या घरी बोलावले. माझ्या मुलाला तुम्ही ट्रिपला का घेऊन गेला, असे म्हणून या मुलांना मारहाण करुन खर्चीवर बसवून दोरीने बांधून ठेवून डोक्याला बंदूक लावून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
त्यानंतर अनिल शिंदे याने पीडित मुलाला व त्याच्या मित्राला , जर इथे काय झाले आहे. हे जर तुम्ही तुमच्या घरी सांगितले तर तुम्हाला व तुमच्या घरच्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. पिडीत मुलाने व त्याच्या मित्राने घडलेला प्रकार त्यांच्या आईवडीलांना सांगितला. त्यानंतर अनिल आदिनाथ शिंदे, त्याची पत्नी व मुलगा (सर्व (शनीनगर, शुक्रवार पेठ फलटण) यांच्या विरुद्ध तक्रार देण्यात आली. त्यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करीत आहेत.