पैठण : मराठा समाजानं कायम एकजूट ठेवली तर सत्ताही मिळेल आणि कधी न पडणाराही पडेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. गनिमी कावा कळू नये म्हणून आड होणारी बैठक पुढे ढकलल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसेच उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे विधानसभा निवडणुकांच्या तारखा आल्यावर ठरवू असंही जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरु करुन आज एक वर्ष झालं आहे. यावेळी ते पैठण तालुक्यातील अंबडमध्ये बोलत होते.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात देखील मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका मांडली आहे. सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी असे जरांगे म्हणालेत. रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा आता निवडणुकीलाच आंदोलन समजा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, 24 तास वीज नाही, पाणी नाही असे जरांगे पाटील म्हणाले.
29 ऑगस्ट 2023 रोजी मराठा समाज एकत्र आला. या घटनेला आज वर्षपूर्ती झाली. कितीही मोठे संकट आले तरी एकत्र आलेलं कुटुंब कोणी तोडू शकत नाही असे जरांगे पाटील म्हणाले. आज माझ्या मराठा समाजाला तळमळीने विनंती आहे की, एखादी गोष्ट नाही मिळाली तर चार दिवस लेट मिळेल,पण विजय तुमच्या पायात येऊन पडणार असल्याचे जरांगे म्हणाले. मी लढायला खंबीर असल्याचेही ते म्हणाले. गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे. त्याला आपण जबाबदार आहोत असंही ते म्हणाले.
मी जातीवादी नाही, मी आरक्षण मागत आहे. तुम्ही एकत्र आल्यामुळं मराठा समाजाला आख्ख जग पाहत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करु लागलेत. मराठा समाज एकत्रित करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वाया जाऊ देणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. आपण सर्वजण एकत्रित राहू असेही ते म्हणाले.