सातारा : साताऱ्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांना युनो मध्ये यु एन पॉप्युलेशन अवॉर्ड नुकताच प्रदान करण्यात आला. हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल मावळा फौंडेशनच्या वतीने त्यांचा नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. पुरस्कारानंतर विविध ठिकाणी त्यांचे सत्कार झाले परंतु मार्गदर्शक,ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे त्या भारावून गेल्या.
ॲड. वर्षा देशपांडे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. लिंग भेदाच्या आधारे होणाऱ्या गर्भलिंग निवडी विरोधात त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. या संघर्षाची दखल घेत त्यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे यु.एन. पॉप्युलेशन ॲवार्ड देऊन गौरवण्यात आले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, जे.आर.डी टाटा यांच्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी हा पुरस्कार मिळाला. नुकताच त्यांना ११ जुलै रोजी न्यूयॉर्क येथे हा पुरस्कार देण्यात आला. विशेष उल्लेखनीय म्हणजे हा पुरस्कार स्विकारताना उत्तम इंग्रजी येत असताना देखील त्यांनी मराठीमध्ये भाषण करुन मराठी जनांची मान अभिमानाने उंचावली या निमित्ताने मावळा फौंडेशनच्या वतीने त्यांचा ह्दयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यावेळी मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, दै. प्रभात निवासी संपादक श्रीकांत कात्रे आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना किशोर बेडकिहाळ म्हणाले, ॲड. वर्षा देशपांडे या सर्वसामान्यांसाठी, समाजातील लिंग भेद नष्ट व्हावा, अन्यायाविरोधात नेहमी लढत आल्या आहेत. आजही त्यांची नाळ समाजाशी जोडलेली आहे. ती या पुरस्कारानंतरही अशीच राहील. यापेक्षाही मोठे पुरस्कार त्यांना मिळो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री. हरिष पाटणे यांनी ॲड. वर्षाताईच्या सुरुवातीच्या काळापासून विविध आठवणी आणि प्रसंग सांगितले. त्यांनी केलेला संघर्ष, त्याला प्रसारमाध्यांनी दिलेली साथ, त्यांच्या विविध लढ्याबाबत घेतलेली भूमिकेला उजाळा दिला. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव आहे. ॲड. वर्षाताईंना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे म्हणाले, ॲड. वर्षाताईंनी नेहमीच अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. केवळ आंदोलन, संघर्ष करुन त्या थांबल्या नाहीत तर अनेक प्रश्न त्यांनी तडीस नेऊन शासनाला, प्रशासनाला त्याबाबत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास लावली आहे. त्यामुळे त्यांचा संघर्ष हा प्रत्येक व्यक्तीसाठी मार्गदर्शक आहे.
सत्काराला उत्तर देताना ॲड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, हा सत्कार एकेकाळचे सहकारी, मार्गदर्शक, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल आनंद आहे. परंतु जागतिक पातळीचा, भारतासाठी अभिमानास्पद असणारा स्व.इंदिरा गांधी, जेआरडी टाटा यांच्यानंतर तब्बल ३३ वर्षानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या सातारच्या महिला आहेत. तरीसुध्दा एकाही लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी याची दखल न घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली. सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन मावळा फाउंडेशनने त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार केल्याबद्दल मावळा फाउंडेशनला त्यांनी धन्यवाद दिले. आयुष्यभर सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष केला. त्यांच्या उपस्थितीत माझा सत्कार केल्याने मी भारावून गेल्याचे सांगितले.
प्रास्ताविकामध्ये मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी ॲड. वर्षाताई देशपांडे यांचा २५ वर्षाचा जीवनपट उलघडला. वृत्तपत्रांनी आणि त्यांना नेहमीच साथ दिली आहे. त्यांच्या संघर्षाच्या काळात वृत्तपत्रे, मीडिया कायम त्यांच्याबरोबर राहिलेला आहे. ॲड. देशपांडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महिलांना नोकरीत घ्यावे, यासाठी मोर्चा काढला होता. त्यामुळेच आज जिल्हा मध्यवर्ती बँकेत महिलांची वर्णी लागली. याचे संपूर्ण श्रेय ॲड. वर्षाताईंना जाते याची आठवण सांगितली.
सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी, तर आभार अनिल जठार यांनी मानले. यावेळी अँड.चंद्रकांत बेबले, वजीर नदाफ, संजय माने, सचिन सावंत, सुवर्णाताई पाटील, दिनकर झिंब्रे, तुषार महामुलकर, अमर बेंद्रे, कैलास जाधव, गुजराती अर्बन, जनता सहकारी बँकेचे सेवक वर्ग आणि सातारकर उपस्थित होते.