सातारा : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने 11 भरारी पथकांची स्थापना केली असून ही पथके दरमहा दोन शाळांना भेटी देवून पोषण आहाराची चव चाखणार आहेत. तसेच पथक याबाबतचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागाला सादर करणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाने वाई तालुक्यास शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, खटाव तालुक्यास शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, कोरेगाव तालुक्यास गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, जावली तालुक्यास उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, महाबळेश्वर तालुक्यास गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, सातारा तालुक्यास गटशिक्षणाधिकारी वनिता मोरे, खंडाळा तालुक्यास गटशिक्षणाधिकारी अनिल सपकाळ, पाटण तालुक्यास गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, माण तालुक्यास गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, कराड तालुक्यास शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, फलटण तालुक्यास लेखाधिकारी संदीप निंबाळकर यांची 11 भरारी पथके स्थापन केली आहेत.
भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागातील नगरपालिका, नगरपरिषदा, खाजगी अनुदानित पात्र शाळांची तपासणी केली जाणार आहे. दरमहा दोन शाळांची तपासणी करुन तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेवून अचानक शाळेची तपासणी करुन वस्तुस्थिती निदर्शनास येईल. पथकास शाळा तपासणी करताना आढळून आलेल्या बाबी भरारी पथकाच्या अहवालाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात, असेही शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची शाळास्तरावर प्रभावी अंमलबजावणी होते का नाही? याची तपासणी भरारी पथक करणार आहे. योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मिळतो का नाही याची खात्री केली जाणार आहे.
याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी