सातारा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..च्या जयघोषात काल मंगळवारी अनेक गणेश भक्तांनी बुधवारी गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या गणेश मुर्ती मोठ्या उत्साहात आणि मोरयाच्या जयघोषात घरी आणल्या.
अधून मधून पडणाऱ्या रिमझिम सरींच्या पावसात गणेश भक्तांचा खरेदीसाठीही उत्साह मोठा दिसून येत होता. सातारा शहरातील मोती चौक, राजवाडा, पोवई नाका परिसरात गणेश पूजेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू तसेच गणेशाला आवडणारी विविध पत्री, कमळे, केवडा, दूर्वा याचबरोबर 21पत्रींमध्ये बेल, तुळस, आघाडा, माका, विष्णुकांत, शमी यासारख्या पत्रीचीही खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती.
सणवार म्हटले की फुलांच्या जणांना मोठा भाव येतो, त्यामुळे सातारा शहरातील अनेक फुलविक्रेत्यांकडे फुलांचे पूजेसाठी हार तसेच केवडा, गुलाब, शेवंती यासारख्या फुलांना मोठी मागणी होती. दोनशे रुपये ते आठशे रुपये किलो दराने ही फुले मोठ्या प्रमाणात विक्री होत होती.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांमुळे वाहतूक कोंडीचा प्रत्यय वारंवार दिसून येत होता. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच स्वयंसेवकही ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आटोकाठ प्रयत्न करताना दिसत होते. मात्र वारंवार वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना अक्षरशा मुख्य रस्ते सोडून छोट्या मार्गाचा तसेच बोळातूनच इकडून तिकडे जाण्याचा प्रसंग येत होता. अनेक सार्वजनिक गणेश मंडळा नी आपल्या मंडळाच्या गणेश मूर्ती मागील आठवड्यापासूनच वाजत गाजत मंडपामध्ये आणून प्रतिष्ठित प्रतिष्ठापना करण्यासाठी आणून ठेवलेले आहेत.
त्यामुळे अनेक रस्त्यात मंडपाचे काम अपूर्ण असतानाही या मूर्ती पडदा आणि कापड टाकून झाकून ठेवण्यात आलेल्या आहेत. बुधवारी सकाळपासून दुपारी पावणेदोन पर्यंत घरगुती गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त सांगितल्यामुळे उद्या सकाळी लवकरच या गणेश मुर्ती घरोघरी आरत्या आणि स्तोत्रांच्या जयघोषात प्रतिष्ठापना केल्या जाणार आहेत.
एकंदरीतच दरवर्षी गणेशोत्सव हा मोठा अल्हाददायक आणि उत्साहवर्धक असा हा उत्सव असल्यामुळे सातारा शहरात ऐतिहासिक अशा शाहू नगरीत एक वेगळेच मांगल्यमय वातावरण दिसून येत आहे.