सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचे माण, खटाव तालुक्यात रविवारी तीव्र पडसाद उमटले. खासदार राऊत यांच्या टीकेचा निषेध नोंदवत भाजप कार्यकर्त्यांकडून कुठे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर कुठे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. कुठे घोषणांनी परिसर दणाणून गेला, तर कुठे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ रविवारी म्हसवड बसस्थानक चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. निषेध आंदोलनाच्या प्रारंभी पदाधिकाऱ्यांनी ‘संजय राऊत यांचा निषेध असो’ अशा घोषणा देत बसस्थानक परिसर दणाणून सोडला. ‘विकासकामांवर बोला, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ,’ असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात नगराध्यक्ष पूजा वीरकर, उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे, नितीन दोशी, डॉ. प्रमोद गावडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होेते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दहिवडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. घोषणांनी परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. या आंदोलनात माजी सभापती अतुलशेठ जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब सावंत, बांधकाम सभापती रुपेश मोरे, महेश कदम, भाजप शहराध्यक्ष संदीप जाधव, पंढरीनाथ जाधव, नगरसेवक महेश जाधव, सयाजी मोरे, धीरज दवे, दत्तात्रय देशमाने, सुधीर जाधव, विशाल घोरपडे, मनोज नाळे, प्रशांत वायदंडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वडूजमध्ये जोरदार निदर्शने
खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ खटाव तालुका भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार राऊत यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तसेच संजय राऊत यांच्या पोस्टरवर जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना निवेदन दिले. यावेळी खटाव तालुका मंडलाध्यक्ष अनिल माळी, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, पंचायत समिती सदस्य हणमंत बोटे, माजी नगराध्यक्ष गणेश गोडसे, नगरसेवक महेश खडके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औंधमध्ये संताप व्यक्त
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गोपूज, ता. खटाव येथे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून घोषणाबाजी करण्यात आली तसेच पुतळा जाळून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी राऊत यांनी केलेले वक्तव्य खालच्या पातळीचे असून, भावना दुखावणारे असल्याचा आरोप केला. भविष्यात अशा प्रकारची आक्षेपार्ह विधाने केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.