कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावरील येथील युनिक उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. दोन दिवसांपासून दोन्ही लेनवरून वाहतूक सुरू केली. त्यामुळे दोन्हीही बाजूला जाणारी वाहने सुसाट गेली. या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या दोन्ही लेनवरून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वाहतूक सुरू झाल्यामुळे मलकापूर शहराला वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळत आहे.
पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गाच्या मलकापूर येथील युनिक उड्डाणपुलाच्या विविध चाचण्या सध्या सुरू केल्या आहेत. लोड टेस्टिंग, बेरिंगसह पिलरवरील नट बोल्टची तपासणीही कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही लेनवरून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करून चाचणी करण्यात आली होती. दोन्ही लेनवरून काही दिवस हलकी वाहतूक सुरू ठेवली होती. ही हलक्या वाहतुकीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर व पावसाचा जोर वाढल्यानंतर उड्डाणपुलाच्या दोन्हीही लेनवरून दोन दिवसांपूर्वी अवजड वाहतुकीला हिरवा कंदील दाखवला.
अवजड वाहतुक सुरू करताच मुंबई पुण्याकडे व कोल्हापूर दिशेला थेट जाणारी वाहने उड्डाणपुलावरून सुसाट जात आहेत. ही वाहने उड्डाणपुलावरून सुरू झाल्यामुळे मलकापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे शहराला वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळत आहे. पुलावरील दुभाजकात विद्युत खांब बसवण्याबरोबरच रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन्ही लेनवरून वाहने धावणार आहेत.
दोन्हीही लेनवर वाहतूक सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि महामार्गावरील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेला हा उड्डाणपूल कराड व मलकापूरच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार आहे. महामार्गावरील प्रवासाला नव्या गतीची जोड मिळणार असल्याची भावना नागरिक, वाहनधारक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करा
युनिक उड्डाणपुलाच्या चाचणीसाठी दोन्ही लेनवरून हलक्या वाहनांची वाहतूक रविवारी सुरू केली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत उड्डाणपुलावरून धावणाऱ्या वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे अवाहन महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
वेगमर्यादा ४० किलोमीटर
उड्डाणपुलाच्या दोन्ही लेनवरून सर्व वाहनांची वाहतूक सुरू केली आहे. पुलावर काही कामे सुरू आहेत. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांसाठी प्रतितास ४० किलोमीटर वेगमर्यादा ठरवून दिलेली आहे. या ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे वाहनधारकांनी पालन करावे, असे अवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.