लेक लाडकी योजनेसाठी आता घरबसल्या अर्ज करता येणार; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 01 November 2026


मुंबई : लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करून अर्ज नोंदणी ते अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
यापूर्वी लेक लाडकी योजनेसाठी अर्जदारांना नजीकच्या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन अर्ज जमा करावा लागत होता. त्यानंतर हे अर्ज प्रकल्प स्तरावर एकत्रित करून तत्कालीन पोर्टलवर त्यांची नोंदणी केली जात होती. पुढे अर्जांची छाननी करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. तसेच अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जावे लागत होते.
शासनाच्या विविध योजनांच्या सुसूत्रीकरणाबाबतच्या सूचनांच्या अनुषंगाने लेक लाडकी योजनेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी नवीन शासन प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत अर्जदारांना स्वतः ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतर (डिबिटी) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. आता अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाइन करण्यात आल्याने योजनेच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नीरा-लोणंद मार्गावरील बाळूपाटलाचीवाडी येथे अपघातात पती ठार, पत्‍नी गंभीर जखमी
पुढील बातमी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल; राहुल गांधी यांचा इशारा

संबंधित बातम्या