सातारा : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवराय पुतळा अपघात प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींच्या अस्मितांना धक्का बसला आहे. महाराजांचा पुतळा उभारण्यात ज्यांच्यामुळे अक्षम्य हलगर्जीपणा घडला आहे. अशा यंत्रणा आणि संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या वतीने शिवतीर्थावर कार्यकर्त्यांच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या पुतळा अपघात प्रकरणाचे राज्यभरामध्ये पडसाद सुरू आहेत. या प्रकरणाचा महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वतीने सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन गुरुवारी दुपारी करण्यात आले. या आंदोलनानंतर अमितदादा कदम आपल्या सहकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद आहे की, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघातग्रस्त होऊन कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना तीव्र आहेत. युगपुरुष शिवरायांचा पुतळा उभारण्यात ज्यांच्यामुळे ही अक्षम्य हलगर्जीपणा घडला आहे व ज्या यंत्रणा दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच छत्रपती शिवरायांचा तसाच पूर्णाकृती पुतळा राजकोट किल्ल्यावर पुन्हा उभारण्यात यावा. यासाठी शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे करण्यासाठी शासनाच्या वतीने ठोस प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा अमितदादा कदम यांनी व्यक्त केली. यापुढे अशी चूक होऊन महापुरुषांच्या अस्मितेला धक्का पोहोचणार नाही याबाबत काळजी घेण्याची मागणी निवेदनात नमूद आहे.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, सेवा दलाचे राजेंद्र लवंगारे, सीमा जाधव, निलेश कुलकर्णी, शिवाजीराव महाडिक, सागर पाटील, जावली तालुकाध्यक्ष साधू चिकणे, अशोक जाधव, शशिकांत वायकर, अप्पा येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.