परळी : सातार्याहून पांगर्याकडे बांधकामाचे साहित्य घेऊन गेलेला डंपर बोरणे गावानजीक 80 ते 90 फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घर बांधकामासाठी लागणारी खडी घेऊन हा डंपर गेला होता. खडी टाकल्यानंतर पांगारीतून सातार्याकडे जात होता. हा डंपर बोरणे गावाच्या हद्दीत आला असता एका वळणावर डंपर चालकाला अंदाज न आल्याने जागेवर फिरत तसाच खोल दरीत पडला. यावेळी आलेला मोठमोठ्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. या परिसरात सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याकडेला कोणत्याही संरक्षक कठडे नसल्याने यापूर्वीही वाहने दरीत पडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे. तसेच संरक्षक कठडेही बांधावेत, अशी मागणी होत आहे.