वडूज : अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आमिषाने पळवून नेणार्याला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. रवी उर्फ रवींद्र विलास नवले (वय 36, रा. नवलेवाडी ता. माण) असे आरोपीचे नाव आहे.
निढळ, ता. खटाव येथील हनुमान विद्यालयातील पेपर झाल्यानंतर पीडित मुलगी दि. 20 जून 2012 रोजी सायंकाळी घरी जात होती. दरम्यान आरोपीने जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसवून शिंदेवाडी (ललगुण) येथे राहत बहिणीच्या घरी नेले. तेथे मुक्काम करून दुसर्या दिवशी सातारा मुंबई येथे घेऊन गेला व तेथे चार दिवस मुक्काम केला. या कालावधीत आरोपीने पीडितेबरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. तिची फसवणूक करून तिला पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक बी. बी. लोंढे यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले व आरोपींविरुद्ध वडूज येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या कामी सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील अजित कदम यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने 14 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपीला तीन वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिने साधी कैद व चार वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.