सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान ऐतिहासिक शाहूनगरीला मिळाला असून, सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष झाले आहेत. हे शतकपूर्व अर्थात ९९ वं संमेलन भरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा प्रतिष्ठानने उचलली आहे. या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व शोभायात्रेने होणारे आहे. ९९ वे संमेलन असल्याने ९९ चित्ररथ असावेत यादृष्टीने नियोजन सुरु आहे. त्यामुळे ग्रंथदिंडी सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी दत्तात्रय मोहिते (मो. ९८९०३१७१०१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.
पत्रकात, आपलं संमेलन, आपला सहभाग हा अभिनव उपक्रम राबवण्याचे ठरवले असून हे संमेलन सर्वसमावेशक करण्याचा दृढ संकल्प करण्यात आला आहे.
सरस्वतीचा हा उत्सव कुण्या एकाच्या आश्रयावर साजरा न करता ऐतिहासिक राजधानी साताऱ्याच्या लौकिकास, स्नेहभावास अनुसरुनउत्सव व्हावा, ही मूळ संकल्पना आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात नेहमी ग्रंथ दिंडीने होत असते. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ही एका भव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रेने होणार असून या ग्रंथदिंडीमध्ये ९९ चित्ररथ असावेत यादृृष्टीने शाळेने ही एक अथवा अनेक चित्ररथ तयार करुन या ग्रंथदिंडीत व शोभायात्रेत भाग घ्यावा. हे ९९ वे संमेलन आपल्या सातारच्या इतिहासात एक संस्मरणीय ठरणार आहे. त्यात सातारा शहर परिसरातील, जिल्हयातील शाळेने त्यात सहभागी व्हावे. चित्ररथासोबत आपल्या संस्थेचे लेझीम पथक, शालेय बॅण्ड, एनसीसी कॅडेट पथक, झांज पथक तसेच अन्य संचालन योग्य व्यवस्था असल्यास त्याचा समावेश दिंडीत करावा. सहभागी चित्ररथ, कलाकार, शिक्षक व संस्थेस सहभाग सन्मानपत्र देण्यात येणार आहे. सहभागी शाळांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येईल तसेच उत्कृष्ठ २५ चित्ररथांना, उत्कृष्ठ ११ संचालनास बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. ग्रंथदिंडीत एकूण ९९ चित्ररथ असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्या चित्ररथास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. ९९ चित्ररथ झाल्यानंतर पुढे संधी मिळणार नाही. त्यामुळे इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी. ग्रंथ दिंडीत आपण जो चित्ररथाचा विषय घेणार आहात तसेच जे पथक (लेझीम पथक, शालेय बॅण्ड, एनसीसी कॅडेट पथक, झांज पथक) भाग घेणार आहे. या सर्व गोष्टींची माहिती १५ दिवसात लेखी पत्राने कळवण्यात यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सुसंस्कृत समाजासाठी साहित्य घरोघरी पोहोचलं पाहिजे, म्हणूनच साहित्य संमेलनाच्या आयोजनास सर्व शाळांचा सहभाग लाभल्यास ते अधिक देखणं, रंजक, प्रबोधनात्मक आणि फलदायी ठरेल अशी अशा असून चित्ररथ नोंदणी, ग्रंथदिंडीत नोंदणीसाठी दत्तात्रय मोहिते (मो. ९८९०३१७१०१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.