साताऱ्यात खणआळीत सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद साहित्य ; चौकशीची मागणी, सीसीटीव्ही तपास सुरू

by Team Satara Today | published on : 19 July 2026


सातारा : शहरातील खणआळी चौक परिसरात रविवारी पहाटे सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद स्वरूपात विविध वस्तू आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. रिक्षा स्टँडजवळील मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेल्या टोपलीत मांसाहारी अन्नपदार्थ, मद्याची बाटली, नारळ, फळे, पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य, चाव्या आणि इतर काही वस्तू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी रिक्षाचालक आणि स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले. सार्वजनिक ठिकाणी अशा स्वरूपाचे साहित्य कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ, मद्याची बाटली आणि इतर साहित्य उघड्यावर ठेवणे हे स्वच्छता तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या प्रकारामागील व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासून संबंधितांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, उघड्यावर ठेवण्यात आलेल्या अन्नपदार्थांमुळे अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच भटके प्राणी आणि लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा घटनांवर वेळीच कारवाई करून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि सुरक्षितता कायम राखावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशासाठी एकत्र आले पाहिजे, तिसऱ्यांदा फसणार नाही, आम्ही अंधभक्त राहू तर छत्रपती शिवाजी महाराजांचे राहू - आदित्य ठाकरे
पुढील बातमी
साताऱ्यात युवकास मारहाणप्रकरणी तरडगावच्या तीन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या