सातारा : पाचगणी पोलीस ठाण्याच्या आवारात संगनमताने पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा शाबित झाला होता. वाई सत्र न्यायालयाने या चौघांची 25 हजाराच्या जातमुचलक्यावर एक वर्षाच्या कालावधीसाठी चांगल्यावर वर्तणुकीच्या हमीवर सुटका केली तर जखमींना आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
या प्रकरणाची माहिती अशी 06 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान गोरखनाथ भैरू पवार, विशाल गोरखनाथ पवार, शरद गोरखनाथ पवार, किरण गोरखनाथ पवार यांना चौकशी करता पाचगणी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. त्यावेळी नाव विचारल्याच्या कारणावरून फिर्यादी व साक्षीदार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना या चौघांनी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला. या घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आला होता, या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस हवालदार शिवाजी पांब्रे यांनी दोषारोप पत्र सादर केले होते.
वाई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर एन मेहरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीत एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा आणि साक्षीदार यांच्या साक्षीवरून दोषींवर गुन्हा सिद्ध झाला परंतु, न्यायालयाने त्यांना शिक्षा न सुनावता प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या बॉण्डवर तितक्याच रकमेच्या जामीनदारासह एक वर्षाच्या कालावधीत चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर अटी शर्तीचे पालन करण्याचे निर्देश दिले. प्रोबेशन ऑफ इंटर सरेंडर या कलमाचा संबंधितांना फायदा देण्यात आला. मात्र प्रत्येक आरोपींनी जखमींना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपी यांना वर्तणूक सुधारण्याची एक संधी देण्यात आली.
सरकारी वकील आशीर्वाद कुलकर्णी यांनी सरकारतर्फे खटल्याचे काम पाहिले पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पांब्रे, पैरवी अधिकारी भुजंगराव काळे यांनी या खटल्यासाठी सहकार्य केले. पोलीस प्रॉसी क्युशन स्कॉडच्या हेमलता कदम, कीर्ती कुमार कदम, प्राची घोरपडे, धीरज तळेकर, शुभांगी शिंदे ,नवनाथ कोळेकर यांनी या कामात मदत केली.