सातारा : कास धरणाची उंची वाढवली गेल्यामुळे सातारकरांना 135 लिटरपेक्षा जास्त क्षमतेने पाणी उपलब्ध झाले आहे. विस्तारित वितरण वाहिका अद्ययावत करण्याचे काम प्रगती पथावर असून त्यादृष्टीने सातारा शहरात प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू झाले आहे. मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनीत असणाऱ्या गुरुकुल टाकीवरून काही भागांना 24 तास पाणी देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
सातारा शहरांमध्ये तब्बल 16000 नळ कनेक्शन असून पैकी साडेदहा हजार कनेक्शनला स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. सातारा शहराची प्रतिमाणशी 135 लिटर पाण्याची गरज आतापासूनच लक्षात घेऊन कास धरणाची उंची 12 मीटर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे साधारण अर्धा ते पाऊण टीएमसी उपलब्ध होणारे पाणी सातारा शहरासह सातारा ते कास मार्गावरील सोळा गावांना सुमारे सव्वा वर्षे पुरते .त्याचबरोबर ज्यादा उपलब्ध होणारे पाणी सायफन पद्धतीने आणि जास्त दाबाने देण्याच्या दृष्टीने जास्त मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनचे काम जवळपास 70 टक्के झाले आहे.
सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आता पहिल्या टप्प्यात शहराच्या पश्चिम भागातील दस्तगीर कॉलनीतील गुरुकुल टाकीवरून मंगळवार पेठ येथील 20 टक्के भागाला 24 तास पाणी देता येईल काय याची चाचपणी सुरू केली आहे. मंगळवार पेठेतील समर्थ मंदिर चौकाकडून फडके हॉस्पिटल ते काशी विश्वेश्वर मंदिर तसेच तेथून महात्मा गांधी क्रीडा मंडळ ते यादो गोपाळ पेठ कॉर्नर या भागातील 700 सदनिकांना पाणीपुरवठा केला जात आहे .या भागातील बहुतांश टाक्यांच्या तोट्या नसल्याने येथील पाणी सातत्याने वाहून जात आहे .पावर हाऊस टाकी येथून थेट गुरुकुल टाकीवर 24 तास पाणीपुरवठा होत असून तीन लाख लिटरची ही टाकी सतत भरून ठेवली जात आहे.
मंगळवार पेठेतील सुमारे 25% सदनिकांचे नळांना तोट्या नसणे किंवा टाकी वाहून पाणी वाया जाणे असे प्रकार घडत आहे .या दृष्टीने स्मार्ट फ्लो मीटर नगरपालिकेने बसवले असून पाण्याचे स्वयंचलित नियमन करणारे व्हॉल्व बसवण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाकडून केल्या जात आहेत. या आगळ्यावेगळ्या आणि सातारा शहरातील पहिल्या प्रयोगाच्या संदर्भाने पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे यांनी पुष्टी केली आहे .हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहराच्या पश्चिम भागातील शाहूपुरी, महादरे, पेढ्याचा भैरोबा या भागांमध्ये सुद्धा याच पद्धतीने पाणी देता येईल का याची चाचपणी पुढील दीड महिन्यांमध्ये केली जाणार असल्याचे संकेत पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत.