सातारा जिल्हा बँकेत भाजपचे वर्चस्व, मात्र सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी व शिवसेनेकडेच; अध्यक्षपदावरून रंगणार चुरस

by Team Satara Today | published on : 04 November 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) संभाव्य एकजुटीमुळे भाजपला अध्यक्षपदापासून दूर राहावे लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख सत्ताकेंद्रे ताब्यात घेण्याचे भाजपचे मनसुबे या निकालांमुळे काहीसे लांबणीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या उभारणीत आणि जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या लोकनेत्यांच्या वारसांचा बँकेत पुन्हा एकदा प्रभावशाली प्रवेश झाला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू पालकमंत्री शंभूराज देसाई हे पाटण सोसायटी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. बँकेला शिस्त लावून तिची देशभरात ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील यांनी एका टर्मच्या खंडानंतर बँकेत जोरदार पुनरागमन केले आहे. यापूर्वी २००२ मध्ये त्यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत संचालकपद मिळवले होते. याशिवाय स्वातंत्र्यसेनानी किसन वीर आबांचे नातू सत्यजित वीर यांच्या रूपाने बँकेच्या संचालक मंडळात तिसऱ्या पिढीचे नेतृत्व दाखल झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रिझर्व्ह बँकेच्या दहा वर्षांच्या सलग संचालकपदाच्या नियमाचा फटका बसल्याने अनेक मातब्बर नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले. माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, नितीन पाटील, अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते आणि कांचन साळुंखे या दिग्गजांना थांबणे भाग पडले. परिणामी, बँकेत संजीवराजे नाईक-निंबाळकर, काका धुमाळ, सर्जेराव सावंत, रूपाली राजपुरे, सत्यजित वीर, चंद्रकांत जाधव, नंदकुमार मोरे, मंगल पाटील आणि योगेश फडतरे यांच्या रूपाने तब्बल नऊ नवे चेहरे संचालक म्हणून बँकेत दाखल झाले आहेत.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरुवातीला मतभेद झाले तरी वरिष्ठ पातळीवर समन्वय साधत पॅनेलची आखणी झाली होती. सोसायटीच्या अकरा जागा वगळता अन्य जागांवर भाजप पाच, राष्ट्रवादी तीन आणि शिवसेना दोन असे सूत्र ठरले होते. सुरुवातीला बिनविरोध झालेल्या नऊ जागांपैकी भाजपने पाच, राष्ट्रवादीने तीन आणि शिवसेनेने एका जागेवर बाजी मारली होती. उर्वरित बारा जागांवर महायुतीतील घटक पक्षच परस्परांच्या विरोधात उभे ठाकले. यामध्ये आठ जागांवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, दोन जागांवर शिवसेना विरुद्ध भाजप, तर दोन जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा थेट लढती झाल्या. या अंतर्गत संघर्षात अखेर भाजपला चार, राष्ट्रवादीला पाच आणि शिवसेनेला तीन जागांवर विजय मिळाला.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत शांत आणि पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी करत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना बिनविरोध निवडून आणले. स्वतः सोसायटी मतदारसंघातून तसेच अर्जुन काळे यांना विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून विजयी करत गोरे यांनी आपल्या गटाचे तीन संचालक बँकेत आणले आहेत. बँकेवर भाजपचाच अध्यक्ष बसवण्याचा त्यांचा निर्धार आता प्रत्यक्ष कसा पूर्ण होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतःसह महिला राखीवमधून मंगल पाटील, संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांच्या विजयामुळे शिवसेनेचे चार संचालक बँकेत आणून आपले स्थान भक्कम केले आहे.
एकूण पक्षीय बलाबल पाहता भाजप नऊ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी जिल्हा परिषदेतील कटू अनुभवांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आणि शिवसेनेचे चार असे एकत्र १२ संचालक होतात. त्यामुळे बहुमताचा आकडा या दोन पक्षांकडे झुकत असल्याने मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई ही जोडी बँकेचे अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. भाजपच्या वतीने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, अंतिम निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतच होणार असल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सूरज गुरव यांची सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती; डॉ. वैशाली कडूकर यांची पुण्यात बदली
पुढील बातमी
ऊसाला प्रतिटन ४,५०० रुपयांसाठी स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा; माजी आमदार शशिकांत शिंदेंची आंदोलनस्थळी भेट

संबंधित बातम्या