सातारा : पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून त्याचे संवर्धन करण्यासोबतच गावाच्या पारंपरिक जलस्रोतांना पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने नायगाव ता.खंडाळा ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला लोकसहभागाची जोड देत ग्रामपंचायत नायगाव येथे वनराई बंधारा उभारणी, ओढा खोलीकरण आणि शिवकालीन जलस्रोत पुनरुज्जीवन कामांचा शुभारंभ करण्यात आला. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते वनराई बंधार्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रशासन, महिला ग्रामसंघ आणि ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागातून जलसंधारणाच्या लोकचळवळीला बळ देण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खोत, खंडाळ्याचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कांचननंद भोईटे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग खंडाळ्याचे उपअभियंता महेश गोंजारी, विस्तार अधिकारी (पंचायत) सनिल बोडरे, नायगावचे माजी सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वनराई संस्थेचे विनायक गार्डे, तालुका समन्वयक अतुल गायकवाड,व उमेद तालुका समन्वयक प्रविण खुडे व प्रभाग समन्वयक सौ.रेश्मा धायगुडे हे उपस्थित होते.
पारंपरिक जलस्रोतांना नवी संजीवनी; लोकसहभागातून पाण्याची शाश्वत वाटचाल
नायगाव, ता. खंडाळा येथे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमात वनराई बंधार्याच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी अडविणे, ओढा खोलीकरणाद्वारे जलप्रवाहाची क्षमता सुधारण्यास हातभार लावणे आणि शिवकालीन जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून पारंपरिक जलव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करणे, अशा विविध कामांचा समावेश आहे. स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक नियोजनानुसार या कामांमुळे पाणी साठवण, भूजल पुनर्भरण आणि जलस्रोतांच्या संवर्धनाला मदत होऊ शकते. विशेष म्हणजे, उमेद अभियानांतर्गत कार्यरत सावित्री-ज्योती महिला ग्राम संघ, नायगाव आणि ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याने जलसंधारणाच्या कामांमध्ये महिला संघटनांची भूमिका ठळक झाली आहे. पाणी व्यवस्थापन हा केवळ प्रशासनाचा विषय नसून प्रत्येक गावाने सामूहिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली.
प्रशासन आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून जलसमृद्धीचा संकल्प
ग्रामीण भागातील पाणी उपलब्धता बळकट करण्यासाठी जलसंधारणाची कामे, पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन आणि लोकसहभाग यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. नायगावमध्ये सुरू झालेला हा उपक्रम गावाच्या नैसर्गिक जलसंपत्तीचे जतन करण्यासाठी तसेच जलसंवर्धनाविषयी जनजागृती वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलस्रोत जतन करा आणि जलसमृद्ध गाव घडवा’ हा संदेश देत नायगावने लोकसहभागातून जलसंधारणाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्धीचा पाया घालणे होय. वनराई बंधारे, ओढा खोलीकरण आणि शिवकालीन जलस्रोतांचे पुनरुज्जीवन यांसारखे उपक्रम पाण्याचे संवर्धन करण्याबरोबरच गावांच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. मात्र, जलसंधारणाचे यश केवळ कामे पूर्ण करण्यात नसून त्यांचे योग्य नियोजन, देखभाल आणि लोकसहभागातून सातत्य टिकविण्यात आहे. ग्रामस्थ, महिला बचत गट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाची जबाबदारी स्वीकारली, तर जलसमृद्ध गावनिर्मितीचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य करता येईल. तसेच जलसंधारण ही केवळ कामांची मालिका नव्हे, तर गावाच्या भविष्याची गुंतवणूक आहे, असे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी म्हटले आहे.
नायगावमध्ये वनराई बंधारा, ओढा खोलीकरण आणि शिवकालीन जलस्रोत पुनरुज्जीवन कामांचा शुभारंभ; याशनी नागराजन यांच्या हस्ते वनराई बंधार्याचे उद्घाटन
by Team Satara Today | published on : 13 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा