सातारा : सातारा जिल्ह्यातील जनसामान्यांचे आधारवड, शिक्षण व सहकारातील पितामह माजी खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. लक्ष्मणराव पाटील यांची पुण्यतिथी बँकेचे मुख्य कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई, संचालक दत्तानाना ढमाळ, सुनील खत्री, रामराव लेंभे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, विविध विभागांचे उपव्यवस्थापक व मान्यवर यांनी स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे प्रतिमेस फुले वाहून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी अनिल देसाई म्हणाले, तात्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला अतिशय मार्गदर्शक असे आहे. समाजकारणात वावरताना विरोधासाठी विरोध अशी भूमिका न घेता सर्वाना बरोबर घेऊन सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या विकासाला प्राधान्य दिले.
दत्तानाना ढमाळ म्हणाले, बोपेगावचे सरपंच, वाई तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, वाई पंचायत समिती सदस्य व सभापती, कृष्णा व्हॅली दुध पुरवठा संघाचे संचालक, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष तसेच लोकसभा सदस्य, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशी स्व. लक्ष्मणराव पाटील यांची यशस्वी कारकीर्द आहे. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजात वेगळा ठसा उमटविला. बँकेच्या प्रगतीमध्ये वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन लाभल्याने बँकेत आर्थिक शिस्त, राजकारणविरहीत कामकाज झाले. त्यामुळेच बँकेचे नाव महाराष्ट्रात नव्हेतर देशात आदराने घेतले जात असलेचे उदगार यावेळी त्यांनी काढले.