गोडसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या साळींदराचे वाचविले प्राण; वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले

by Team Satara Today | published on : 12 December 2025


गोडसेवाडी : गोडसेवाडी, ता. कोरेगाव येथे एका शेतातील विहिरीत पडलेल्या साळींदर या वन्य प्राण्याची वनविभागाच्या पथकाने स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अतिशय शिताफीने प्राण वाचविले. या प्राण्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. जिल्हा उपउपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबविण्यात आली.

वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता या घटनेची माहिती दिली. एकसळ येथील अर्जुन अवधूतराव भोसले व त्यांचे शेतमजूर गिरीश पुजारी यांना गोडसेवाडी येथील पानस शिवारातील शेतालगतच्या विहिरीत साळींदर पडल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्वरित वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे व वनपाल दीपक गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत विहिरीतील परिस्थितीची पाहणी केली.

साळींदरास कोणतीही इजा होऊ नये म्हणून साखळी पद्धत, जाळी व दोरींचा वापर करून सुरक्षित अंतर ठेऊन नियोजनबद्ध रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. काही वेळातच साळींदरास विहिरीबाहेर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर वन्यप्राण्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

या मोहिमेत ग्रामस्थांनी दिलेले सहकार्य विशेष कौतुकास्पद ठरले. त्यांच्या जागरूकतेमुळे व तातडीने दिलेल्या माहितीमुळे वन्यप्राण्याचे प्राण वाचविणे शक्य झाले असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

वनविभागाने ग्रामस्थांचे आभार मानत, वन्यजीव आपली मौल्यवान वनसंपत्ती असल्याने त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.

या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे, वनपाल दीपक गायकवाड, वनरक्षक प्रतिक गायकवाड, तसेच कायम वनमजूर नारायण जाधव, सहकारी सोमनाथ काटकर, गणेश जाधव, अमर जाधव सहभागी झाले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय 'बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ
पुढील बातमी
विद्यार्थ्यांच्या अंगी कला गुण वाढवण्यासाठी बालकुमार साहित्य संमेलन - डॉ. दिलीप गरुड ; लोकमंगल हायस्कूल येथे सतरावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात

संबंधित बातम्या