सातारा : किल्ले सज्जनगडावर वाहन तळ पायरी मार्ग तसेच गडाच्या पाठीमागील बाजूला कचऱ्यांचे ढिगारे आहेत. यामध्ये मुख्यतः व्यावसायिकांचा प्लास्टिकचा कचरा असल्याने, या कचऱ्याचे उच्चाटन योग्य विल्हेवाट करावी कचऱ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अशा सूचना गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिल्या असून, येत्या काही दिवसातच गडावरील व्यवसायिक गडावरील दोन्ही संस्था यांना कचऱ्यावर उपाययोजना करावी तसेच ज्यांच्याकडून कचरा निर्माण होत आहे. अशा व्यवसायिकांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात येणार असून, त्यात बदल न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, विस्तार अधिकारी शंतनू राक्षे यांनी दिली आहे.
गेल्या चार दिवसापूर्वी "स्वच्छता ही सेवा" हे अभियान राबविण्यासाठी तालुका ग्रामपंचायत विभाग गडावर गेले होते. यावेळी गडावर कचऱ्याचे ढिगारे पाहून हे अधिकारीही अवाक झाले होते.
तसेच अशोक वनात स्वयंपाकांच्या मोठ्या भांड्यात पाणीसाचून, त्यामध्ये डासांची निर्मिती होत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे कीटकजन्य आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण होत असल्याने, त्यांनी तात्काळ ते पाणी ओतून भांडी स्वच्छ करण्याची सांगितले होते. वाहन तळाच्या चारही बाजूला कचऱ्यांचे ढिगारे पाहिल्याने अधिकाऱ्यांनी कचरा करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यासाठी आता पाऊल उचलले आहे.
गडावरील कचरा वन हद्दीत!
गडावरील कचरा हा गडावरून वन हद्दीत कडेलोट केला जातो. अशा तक्रारी वन विभागाकडे दाखल झाल्याने वनविभागहि आता ॲक्शन मोडवर आहे. अशी माहिती वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांनी दिली आहे.