सातारा : शहरातील सदरबाजार परिसरातील भीमाबाई आंबेडकर नगर येथे किरकोळ कारणावरून दोन जणांनी कोयत्याने हल्ला करून एका तरुणाला जखमी करत परिसरात तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि. ६) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजेंद्र पवार (वय २७, रा. भीमाबाई आंबेडकर नगर, सदर बाजार, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, ऋतिक जाधव व शुभम जाधव (पूर्ण नाव माहित नाही, दोघेही रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा) यांनी कोणतेही कारण नसताना फिर्यादीच्या उजव्या पायाच्या नडगीवर कोयत्याच्या उलट्या बाजूने वार करून जखमी केले. तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचवेळी आरोपींनी झोपडपट्टी परिसरातील जमीर जहांगीर काझी यांच्या एमएच-११-सीजे-२५९९ क्रमांकाच्या रिक्षेच्या पुढील काचेची कोयत्याने तोडफोड केली. तसेच दीपक सुनटे यांच्या स्विफ्ट कारची काच व दरवाजा फोडून नुकसान केले. याशिवाय चित्रा तानाजी सावंत यांच्या घराच्या दरवाजाचेही कोयत्याने नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात ऋतिक जाधव व शुभम जाधव यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस हवालदार पोतेकर करत आहेत.