पालकांनी मुलांमध्ये शिवविचारांचा संस्कार रुजवावा : मृणाल कुलकर्णी

महाराष्ट्रातील पहिल्या शिवसाहित्य संमेलनाचे सातारा शहरात उद्घाटन

सातारा : छत्रपती शिवराय हे तत्कालीन परिस्थितीतील स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी युगपुरुष होते. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे दोन विचार दिले. आजच्या युगात सुद्धा पालकांनी मुलांचे भवितव्य घडवणारे शिव विचारांचे संस्कार मुलांना द्यावे अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री व लेखिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

शिवजयंती महोत्सव सातारा संयोजन समितीच्या वतीने येथील शाहू कला मंदिरामध्ये पहिल्या शिव साहित्य संमेलनाचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले याप्रसंगी मृणाल कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आयसीसीआर चे माजी अध्यक्ष खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, सातारा पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट, सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, विश्वस्त महाराजा शिवप्रतिष्ठान कार्याध्यक्ष विनीत कुबेर, उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषद कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालक एडवोकेट नितीन शिंगटे, शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अमित कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजक दत्ताजी थोरात, नगर वाचनालय साताराचे संचालक अतुल शालगर, समरसता गतिविधी संघटनेचे जिल्हाप्रमुख जयंत देशपांडे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी चे अध्यक्ष नंदकुमार सावंत, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

मृणाल कुलकर्णी पुढे म्हणाल्या, मला माझ्या आयुष्यात राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारताना खूप काही शिकायला मिळाले. ही भूमिका मिळणे म्हणजे एक दैवयोग होता. आजच्या पालकांनी समाज रचना घडवणारे विचार मुलांना द्यावेत. राजमातांनी शिवरायांना स्वातंत्र्य व स्वराज्य हे दोन विचार दिले होते. दोन पिढ्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद ठेवावा, त्यांना शिवविचारांचे संस्कार द्यावेत, म्हणजे मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव होईल. आपल्या पराक्रमी तेजस्वी इतिहासाचे स्मरण करून द्यावे. त्याकरता अशा साहित्य संमेलनांमध्ये पालकांनी आपल्या मुलांसह आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अजिंक्यतारा आणि सातारा ही वीरांची भूमी आहे. अशा संमेलनाच्या माध्यमातून आपल्या शूर पूर्वजांचा आपण शोध घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदा साडेतीनशेवे वर्ष आहे. मात्र या ऐतिहासिक घटनेचे विस्मरण दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांना झाले आहे हे दुर्दैवी आहे. सामाजिक परिवर्तन, कुशल युद्धनीती, प्रगल्भ कृषी धोरण, सांस्कृतिक परिवर्तन, आर्थिक सुबत्ता ही पाच सूत्रे छत्रपती शिवरायांनी राबवली त्यामुळे ते वेगळ्या धाटणीचे युगपुरुष बनले. आजही त्यांची तत्वे राज्य चालवणार्‍यांना किंवा देश चालवणारांना मार्गदर्शक ठरतात शिव साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शिव विचारांचा जागर हा देश पातळीवर तसेच जागतिक पातळीवर व्हावा आणि आपल्या सांस्कृतिक व सामाजिक परंपरेचे प्रगल्भदर्शन संपूर्ण मानव जातीला व्हावे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सचिन राजोपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. मान्यवरांचे स्वागत संयोजन समितीच्या वतीने शाल व शिवचिन्ह देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनीत कुबेर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या आयोजनाचा मूळ हेतू विनोद कुलकर्णी यांनी विशद केला. जयंत घाटपांडे यांनी आभार मानले.



मागील बातमी
हनी ट्रॅप प्रकरणी चारजणांवर गुन्हा
पुढील बातमी
जिल्ह्यातील धरणांमध्ये चाळीस टीएमसी पाणीसाठा

संबंधित बातम्या