ही आपल्याच देशाचे मुलं आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज करून दमन करू नका, तर त्यांच्याशी समोरासमोर बसून चर्चा करा - अरविंद केजरीवाल

by Team Satara Today | published on : 20 July 2026


दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली सध्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या 'चलो संसद' मार्चमुळे पूर्णपणे हादरून गेली आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत असताना, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या दिल्लीत नसून पंजाब दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांनी पंजाबमधूनच एक खास व्हिडिओ संदेश पोस्ट करत आंदोलकांचे मनोबल वाढवले आहे. "ही आपल्याच देशाचे मुलं आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज करून दमन करू नका, तर त्यांच्याशी समोरासमोर बसून चर्चा करा," असे थेट आवाहन केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केले आहे.

पंजाबमधून जारी केलेल्या व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल म्हणाले, "मित्रांनो, मी सध्या पंजाबमध्ये आहे आणि सोशल मीडियावर पाहतोय की दिल्लीतील कनॉट प्लेस, जंतर-मंतर आणि जनपथवर प्रचंड गर्दी जमली आहे. देशभरातून हजारो तरुण दिल्लीत एकत्र आले आहेत. परंतु, सरकार या मुलांवर सर्व शक्तीनिशी दमनशाही चालवत आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे, त्यांना मारहाण केली जात आहे."

"युवकांचे भविष्य उद्ध्वस्त केले, आता दादही मागू द्यायची नाही का?"

केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करताना केजरीवाल पुढे म्हणाले, "तिथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना संसदेकडे जाण्यापासून रोखले जात आहे, हे पूर्णपणे चुकीचे आहे. देशातील तरुणांनी शेवटी जायचे तरी कुठे? तुम्ही आधीच त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. आता जेव्हा ते रस्त्यावर उतरून तुमच्याकडे न्याय मागत आहेत, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर लाठ्या चालवत आहात. ही अजिबात योग्य पद्धत नाही."

१४-१४ तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय: भगवंत मान

अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीदेखील आंदोलक विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे. "असंख्य तरुण अशी स्वप्ने पाहतात की एक पुस्तक त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य बदलेल. पहाटे ३.०० वाजताचा अलार्म लावून ही मुले अभ्यासाला बसतात. सलग १४-१४ तास अभ्यास करून ती नीटची परीक्षा देतात. पण, परीक्षेच्या दिवशी पेपर लीक झाल्याचे समजते आणि बड्या श्रीमंतांनी पेपर विकत घेतल्याचे समोर येते. मग तेच डॉक्टर बनतात, हे अत्यंत चुकीचे आहे," अशा शब्दांत भगवंत मान यांनी पेपर लीक प्रकरणावर जोरदार टीका केली. जंतर-मंतरवर जमलेल्या सर्व आंदोलक विद्यार्थ्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असून आम्ही या लढ्यात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वासही भगवंत मान यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकसभा, राज्यसभेत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून प्रचंड गोंधळ; तीन वेळा कामकाज स्थगित, राज्यसभेत खरगे यांची सरकार टीका
पुढील बातमी
छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार ! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, केंद्र सरकारचा निषेध

संबंधित बातम्या