शाहूपुरी चौकाचा चेहरामोहरा बदलला; अतिक्रमणे जमीनदोस्त, पालिकेची धडक कारवाई

25 अतिक्रमणांपैकी 19 अतिक्रमणांवर कारवाई पूर्ण; सहा प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत

by Team Satara Today | published on : 20 August 2026


सातारा : शहरातील वर्दळीच्या शाहूपुरी चौक परिसरातील अतिक्रमणांवर सातारा नगरपालिकेने सलग दुसर्‍या दिवशीही धडक कारवाई करत 19 अतिक्रमणे हटविली. एलआयसी कॉलनीसमोरील पक्क्या बांधकामांवर जेसीबी फिरल्याने रांगोळे कॉलनी, मोळाचा ओढा आणि माळवाडीच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक खुला झाला आहे.

शाहूपुरी चौकातील 25 अतिक्रमणांपैकी 19 अतिक्रमणांवर कारवाई पूर्ण झाली असून, सहा प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या अतिक्रमणांबाबत पुढील कार्यवाही होणार आहे. गुरुवारी सकाळी पालिकेचे पथक दाखल होताच काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून वीजपुरवठा बंद करून साहित्य हटविले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने बांधकामे पाडण्यात आली. हटविलेले साहित्यही तत्काळ बाजूला करण्यात आले.

अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्या दिवसाच्या कारवाईनंतर दुसर्‍या दिवशी नागरिक व अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला सहकार्य केल्याने मोहीम तुलनेने सुरळीत पार पडली.

अतिक्रमणांमुळे अरुंद झालेल्या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या निर्माण झाली होती. आता मार्ग खुला झाल्याने वाहनचालक व पादचार्‍यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, मोकळी झालेली जागा पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात जाऊ नये, यासाठी पालिकेला सातत्याने देखरेख ठेवावी लागणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन; सातार्‍यात संताप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
पुढील बातमी
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार शोधा; अंनिसचा सरकारला इशारा, न्यायालयीन निर्णयाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करावी

संबंधित बातम्या