ड्रॅगन फळ हे निवडुंग पासून येते, म्हणूनच ज्या प्रदेशात पाणी मुबलक नाही तेथे ते पिकवता येते. ड्रॅगन फ्रूट मध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याचे सेवन केल्याने तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय राहू शकता. ड्रॅगन फ्रूट मध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट चांगल्या प्रमाणात असतात जे मेटाबॉलिज्मसाठी चांगले असतात. त्यात व्हिटॅमिन-बी देखील असते जे मूड सुधारते. यामध्ये असलेले कॅल्शियम दात आणि हाडे मजबूत करते.
ड्रॅगन फ्रूटला पिटाहया किंवा पिताहया असेही म्हणतात. ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस फळ म्हणूनह ओळखले जाते, हे मूळतः दक्षिण अमेरिकेत आढळणारे आणि बहुतेक उष्णकटिबंधीय आशियाई देशात उगवलेले फळ आहे. आकर्षक, चमकदार दिसणारे फळ लाल-गुलाबी रंगाचे असून त्याची पाने हिरव्या रंगाची असतात. त्याचा लगदा पांढरा आणि बिया काळ्या असतात. तो ड्रॅगन सारखा दिसतो, म्हणूनच त्याला ड्रॅगन फ्रूट नाव देण्यात आले. हे इतर फळा पेक्षा वेगळे असले तरी त्याची चव इतर फळा सारखीच आहे. त्याची चव किवी आणि नाशपातीसा रखी असते.
ड्रॅगन फ्रुट मध्ये कॅलरीज कमी असतात. परंतु, त्यात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ड्रॅगन फ्रुटच्या एका कप (२२७ ग्रॅम) मध्ये पुढील पोषक तत्वे आढळतात- कॅलरीज १३६, प्रथिने ३ ग्रॅम, चरबी ० ग्रॅम, कर्बोदके २९ ग्रॅम, फायबर ७ ग्रॅम, लोह ८%, मॅग्नेशियम १८%, व्हिटॅमिन-सी ९%, व्हिटॅमिन-ई ४%, पॉलिफेनॉल, कॅरोटीनोइड्स.
व्हायरल आजारात उपयोगी : डेंगू, मलेरिया, कावीळ, आणि इतर व्हायरल आजार झाल्यास ड्रॅगन फ्रुट अत्यंत फायदेशीर समजले जाते. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यास आवर्जून हे फळ खावे.
हाडांच्या आरोग्यासाठी : ड्रॅगन फ्रुट मध्ये कॅल्शियम भरपूर असते. हाडांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. कॅल्शियम कमतरतेनं होणारा ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत होते. कॅल्शियम युक्त ड्रॅगन फळ हाडांची घनता आणि संपूर्ण आरोग्य राखण्यास फायदेशीर आहे.
खराब कोलेस्ट्रॉल कमी करते : ड्रॅगन फ्रूट मध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. यसमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. याच्या बियात ओमेगा-३, ओमेगा-६ फॅटी अॅसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. हे शरीरासाठी चांगले चरबी आहेत जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
प्रतिकारशक्ती वाढवते : ड्रॅगन फ्रूट मध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे शरीराला अनेक संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण मिळते. त्यात फॉस्फरस, कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे B-2, B-1, B-3, लोह, फायबर आणि नियासिन देखील असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यास मदत करतात. ड्रॅगन फ्रूट मधील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
पचनास मदत करते : ड्रॅगन फ्रूट मध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. ते पचनसंस्था सुधारते आणि आतड्याची हालचाल नियंत्रित करते. तसेच अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या पोटाशी संबंधित अनेक समस्या कमी करण्यास मदत करते. या फळाचे रोज सेवन केल्याने कोलोरेक्टल कॅन्सर सारख्या गंभीर आजारा पासूनही बचाव होतो.
कर्करोग प्रतिबंधित करते : ड्रॅगन फ्रूट मध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स मुळे कर्करोगाच्या पेशींचे उत्पादन रोखण्यास मदत करतात. या फळात असलेले क्रोटीन कर्करोग विरोधी गुणधर्मांनी समृध्द आहे जे ट्यूमरचा धोका कमी करण्यास मदत करते.
चयापचय वाढवते : ड्रॅगन फ्रूट प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. हे प्रथिन शरीरातील एन्झाइम्स द्वारे चयापचय केले जाते आणि शरीराद्वारे वापरण्यायोग्य प्रोटीन मध्ये रूपांतरित होते, जे पेशी दुरुस्त करण्यास, चयापचय वाढविण्यास, वजन कमी करण्यास आणि स्नायू तयार करण्यास मदत करते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते : ड्रॅगन फ्रूट मध्ये फायबर असल्यामुळे ते मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, कारण ते मधुमेहाच्या रुग्णात साखरेची पातळी स्थिर ठेवते आणि साखरेच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करते.