सातारा : पुणे येथे इंडो स्पॅनिश चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीदरम्यान इंडो स्पॅनिश चेंबर ऑफ कॉमर्स (आयएससीसी) आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. या 'एमओयू'मुळे 'मास' सदस्यांच्या उत्पादनांच्या स्पेनमध्ये निर्यात वाढीस चालना मिळणार आहे. तसेच स्पॅनिश उद्योगांशी सहकार्य, संयुक्त संशोधन व विकास आणि आयात पर्याय निर्मितीसाठी संधी निर्माण होणार आहे. याशिवाय, स्पॅनिश कंपन्यांना सातारा जिल्ह्यातील पुरवठादार विकास, मेक इन इंडिया उपक्रम आणि स्थानिक संस्थांमार्फत विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी संधी मिळणार आहेत.
ही बैठक दि. २ एप्रिल रोजी पुणे येथे झाली. हा सामंजस्य करार करण्यासाठी 'आयएससीसी'चे अध्यक्ष ऑस्कर एस्टेबन यांनी मास प्रतिनिधी यांना आमंत्रित केले होते. मासतर्फे संचालक धैर्यशील भोसले यांनी ह्या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी स्पेनचे आर्थिक व वाणिज्य सल्लागार व्हिन्सेंट गोमिस, 'आयएससीसी'चे संचालक व 'बीबीव्हीए'चे आशिया प्रतिनिधी जोएल अकीलन व 'मास'चे संयुक्त सचिव राहुल शिंदे उपस्थित होते.
स्पॅनिश कंपन्यांचे प्रतिनिधी, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी आणि स्पॅनिश आर्थिक व वाणिज्य दूतावासाचे सदस्यही या बैठकीस उपस्थित होते आणि त्यांनी 'मास'सोबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.