सातारा : जुन्या काळातील पत्रकारिता ही अवघड असतानाही आव्हानात्मक काम झाले आहे. सध्या डिजिटल जर्नालिझममुळे संपूर्ण चित्र बदलत चालले आहे. पत्रकारांनी स्थानिक पातळीवर होत असलेल्या अन्यायाचे प्रश्न सोडवणे समाजहिताचे काम आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य हीच लोकशाही आहे. पत्रकारांनी बदलत्या परिस्थितीकडे लक्ष दिले नाही तर पत्रकारितेची उपयोगिता कमी होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांनी केले.
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा पत्रकार संघ आणि सातारा तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी रविवारी कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते. कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशांत कदम म्हणाले, दिल्लीतील वार्तांकनामुळे मला चांगले अनुभव मिळाले. देशाच्या संसदेमधील वार्तांकन, नोटाबंदी, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यानंतर त्याचे वार्तांकन करण्याची मला संधी मिळाली. आव्हानात्मक परिस्थितीत काम करताना पत्रकारितेच्या दृष्टीने सुरक्षेचे भान ठेवून काम करणे गरजेचे आहे. सध्या न्यूज चॅनेलची संख्या झपाट्याने वाढली असून दिवसभरात वारंवार एकच बातमी दाखवणे यामुळे त्याचा प्रभाव कमी होत आहे. माध्यमात काळानुसार नवीन बदल करावे लागणार आहेत.
प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले, कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय पत्रकारिकेतील नवीन धोरणांची माहिती घेवून पत्रकारांनी सर्व ज्ञान अवगत करावे, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पत्रकाराने समाजातील प्रश्नांना शोधून ते लोकांसमोर उकल करणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी आमच्या कॉलेजचे व्यासपीठ कायम उपलब्ध करुन देणार, अशी घोषणा प्राचार्य राजेंद्र मोरे यांनी केली.
हरीष पाटणे म्हणाले, मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांच्यासारखा चांगला अभ्यासू वक्ता या कार्यशाळेस मिळाला, हे आपले भाग्य आहे. प्रशांत कदम यांनी आपल्या वार्तांकनातून वाखणण्याजोगे काम केले आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांच्या ज्ञानात भर पडणार आहे. पत्रकारांमधील शिस्तबद्धता, उत्तम लेखन व व्यवस्थित वृत्तांकन यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकाराने शिकून आपल्यामध्ये बदल करावयाचा आहे. पत्रकाराने संकुचित वृत्ती न बाळगता व्यावसायिकरण करताना पत्रकारितेमधील तत्वे पाळणे गरजेचे आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून करण्यात आले यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, सचिव गजानन चेणगे, खजिनदार अमित वाघमारे, संघटक अजित जगताप, सातारा तालुका अध्यक्ष अजय कदम, उपाध्यक्ष विजय जाधव, सुनील साबळे, कार्याध्यक्ष बाळू मोरे, सचिव राहुल ताटे आदी पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचलन अजय कदम यांनी केले. आभार प्रा. डॉ. संपत पिंपळे यांनी मानले.