सातारा : जिल्हा निबंधक वर्ग एक मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक याला 5000 रुपयांची लाच घेताना सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
पल्लवी रामदास गायकवाड वर्ग 3 मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सातारा राहणार मुक्काम पोस्ट पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा असे संबंधित आरोपीचे नाव आहे.
या कारवाईबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांचा वडिलोपार्जित मिळकती बाबतचा बहीण-भाऊ यांच्यामध्ये कौटुंबिक दावा सातारा येथील दिवाणी न्यायालय सुरू होता. या प्रकरणामध्ये उभय पक्षांमध्ये तडजोड झाली. सैदापूर येथील तलाठी कार्यालया मार्फत हा तडजोड हुकूमनामा मुद्रांकित करून आणण्यात यावा, असे आदेश बजावण्यात आले. संबंधित तक्रारदाराने हा हुकूमनामा मुद्रांकित करण्यासाठी सहजिल्हा निबंधक वर्ग एक मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज केला होता. मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील चुकवलेला मुद्रांक शुल्क या कार्यासनाचा पदभार असलेल्या लोकसेविका पल्लवी गायकवाड यांनी तक्रारदारांना पंचांसमक्ष पाच हजार रुपये लाच मागितली.
त्यांना ही लाच स्वीकारताना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हवालदार एस के राजपुरे, थोरात,जाधव व गुरव यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.