मुख्यमंत्रीच निर्णय घेत असल्यामुळे महायुतीत नाराजी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा

by Team Satara Today | published on : 25 August 2026


नागपूर : महायुती सरकारमध्ये एकवाक्यता नसून कोणत्याही विभागाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतात आणि त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असल्यानेच समन्वयाच्या बैठका घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोमवारी केला.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी पुरोगामी विचारांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत. या भेटीमागे काँग्रेसचे कोणते सूत्र आहे, हे आम्हाला माहिती नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे- पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

आश्वासनांची पूर्तता न झाल्याने एकनाथ शिंदे यांच्यावर रोष असल्याचे सांगत, हा संभ्रम दूर करण्यासाठी उदय सामंत भेटणार असतील, असे शिंदे म्हणाले. दोन समाजांत अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न महायुतीने केला असून त्याचे परिणाम आता समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमरावतीतील रुग्णालय दुर्घटनेवर बोलताना दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. केवळ घोषणा न करता रुग्णालयांना आवश्यक सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी सरकारने करावी, असेही ते म्हणाले.

'बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली' काढणार

महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून युवा वर्गात मोठी नाराजी आहे. कायमस्वरूपी नोकऱ्यांऐवजी पॅकेज आणि अप्रेंटिसशिपच्या नावाखाली तरुणांना तात्पुरत्या संधी दिल्या जात आहेत. वर्षानुवर्षे भरती प्रक्रिया रखडली आहे. या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्टला राज्यातील सहा विभागांत 'बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली' काढण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आंदोलन करून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याची मागणी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना महिनाभराची मुदत देण्यात येईल, त्यानंतर मोठे आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर योग्य निर्णय न झाल्यास राहुल गांधी यांच्यासमवेत मोठे आंदोलन करू - आमदार रोहित पवार यांचा सरकारला इशारा
पुढील बातमी
तारळे परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची ट्रॅव्हल चिखलात रुतली, ग्रामस्थांनी प्रवाशांना पिठलं-भाकरी खाऊ घालत माणुसकी जपली

संबंधित बातम्या