सातारा : ग्रामीण जनतेचे कैवारी आणि सहकार महर्षी म्हणून ओळखले जाणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या सातारा येथील पोवई नाका परिसरातील तैलचित्ररूपी स्मारकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्य प्राणालीद्वारे उत्साही वातावरणात लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरम यशराज देसाई, उपननगराध्यक्ष डी.जी. बनकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोवई नाका या सातारच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारण्यात आलेले हे तैलचित्ररूपी स्मारक बाळासाहेब देसाई यांच्या उत्तुंग कर्तृत्वाची आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सहकार अन् सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची साक्ष देते. ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि सहकार क्षेत्राला दिलेली दिशा आहे. त्यांनी महाराष्ट्रात रस्ते पुलांचे जाळे निर्माण केले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, शिक्षण संस्थांचा विस्तार व्हावा आणि सामान्य कुटुंबातील मुलांना पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. लोकेनेते बाळासाहेब हे दूरदर्शी नेते होते त्यांनी संसदीय लोकशाहीचा पाया रचला. त्यांचे स्मारक युवा पिढीला ऊर्जा, प्रेरणा देणारे ठरेल, असाही विश्वास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाची उभारणी केली असून हे स्मारक सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, हे स्मारक येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून देईल, असेही त्यांनी सांगितले.