जिल्हा बँकेच्या रणांगणात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीत कुणाचा राहणार वरचष्मा? ठरावांच्या ताकदीवर महायुतीत जागांची बेरीज-वजाबाकी, रविवारी महायुतीची निर्णायक बैठक

by Team Satara Today | published on : 08 October 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांची गर्दी झाल्यानंतर आता खरी राजकीय लढाई महायुतीच्या जागावाटपावर येऊन ठेपली आहे. सोसायटी मतदारसंघाच्या 11 जागा बाजूला ठेवून उर्वरित दहा जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रविवारी (दि. 11) घटस्थापनेच्या दिवशी निर्णायक खलबते होणार आहेत. ज्याचे जितके ठराव, त्या प्रमाणात जागा’ हा फॉर्म्युला पुढे करण्यात आला असला तरी ठरावांच्या आकड्यापेक्षा राजकीय ताकद आणि भविष्यातील समीकरणे जागावाटपात किती वजनदार ठरतात, यावरच या बैठकीचे यश अवलंबून राहणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत सूचक भूमिका मांडली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून, आता अंतिम स्वरूपासाठी रविवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे दहा जागांमध्ये कोणाचा वाटा वाढणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत 162 उमेदवारांचे 224 अर्ज दाखल झाले आहेत. गृहनिर्माण मतदारसंघातून ज्ञानेश्‍वर पवार यांनी माघार घेतल्याने उदयनराजे भोसले यांच्यासाठी या मतदारसंघातील समीकरण अधिक अनुकूल झाले आहे. दुसरीकडे, 20 ऑक्टोबरच्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक विद्यमान संचालकांनी एकाच मतदारसंघातून पर्यायी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील अनिश्चितता कायम आहे.
महायुतीच्या छत्राखाली निवडणूक लढवायची असली तरी प्रत्येक पक्षाला आपली राजकीय ताकद दाखवायची आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला कागदावर सोपा असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करताना मोठी राजकीय कसरत करावी लागणार आहे. जिल्हा बँकेवरील वर्चस्वाची पुढील दिशा याच चर्चेत ठरण्याची शक्यता आहे.
जयकुमार गोरे यांच्या अनुपस्थितीवरून सुरू झालेल्या चर्चेलाही शिवेंद्रसिंहराजे यांनी पूर्णविराम दिला. भाजपमध्ये कोणाच्या हातात सूत्रे आहेत, असे काही नाही. जयकुमार गोरे, मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम आणि आम्ही सर्वजण एकत्र बसून चर्चा करीत आहोत,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत नेतृत्वाची चर्चा बाजूला सारत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सामूहिक निर्णयाचा संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महायुती म्हणूनच निवडणूक लढविली जाणार असून, बँकेची परंपरा आणि आर्थिक क्षमता टिकवून ती पुढे नेण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत जागावाटपातून कोणाची ताकद वाढते आणि कोणाचा प्रभाव कमी होतो, यावरच महायुतीच्या एकजुटीची खरी परीक्षा होणार आहे.
दरम्यान, सातारा शहरातील गोडोली उड्डाणपूल, प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपराक्रमाचे स्मारक यांसह विविध विकासकामांचे सादरीकरण शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर करण्यात आले. आचारसंहितेनंतर या प्रस्तावांवर कार्यवाही करण्याचे संकेत त्यांनी दिले.
दहा जागा; दावेदार अनेक!
महायुतीचा ठरावांच्या प्रमाणात जागा’ हा फॉर्म्युला निश्चित मानला, तरी भाजपचा प्रभाव, शिवसेनेची जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद आणि राष्ट्रवादीची मतदारसंघनिहाय पकड यांचा ताळमेळ जागावाटपात साधावा लागणार आहे. त्यामुळे रविवारी होणारी बैठक ही केवळ जागांची विभागणी नसून जिल्हा बँकेवरील आगामी राजकीय वर्चस्वाची बेरीज-वजाबाकी ठरविणारी बैठक ठरणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भुईंजच्या श्रीमहालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी; रविवारपासून घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होणार
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात पूर्व भागाला दुष्काळाच्या झळा; 35 टँकरद्वारे पाणी पुरवठा, 16 विहिरी आणि 9 बोअरवेलचे अधिग्रहण

संबंधित बातम्या