तारळे : मुंबईहून तारळे परिसरात पर्यटनासाठी आलेल्या ३२ प्रवाशांचा रस्ता चुकला आणि त्यांची ट्रॅव्हल्स दुर्गम बागलेवाडी परिसरात चिखलात रुतली. त्यातच मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली. मदतीची अपेक्षा मावळत असताना एका प्रवाशाने डायल ११२ वर संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर रात्री उशिरा बस सुरक्षितपणे चिखलातून बाहेर काढली. दरम्यान, दिवसभर अडकून पडलेल्या प्रवाशांना बागलेवाडी ग्रामस्थांनी पिठलं-भाकरी खाऊ घालत माणुसकी जपली.
मुंबईहून ३२ प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स २२ ऑगस्ट रोजी तारळे भागात पर्यटनासाठी आली होती. रस्ता चुकल्याने ती बागलेवाडीच्या दुर्गम भागात पोहोचली. दुपारी बाराच्या सुमारास बस चिखलात अडकली. बसमध्ये महिला, पुरुष आणि लहान बालकांचाही समावेश होता. मुसळधार पाऊस सुरू असल्याने चिखल वाढत गेला आणि बस बाहेर काढणे कठीण झाले.
प्रवाशांनी डायल ११२ वर संपर्क साधल्यानंतर तारळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र कचरे आणि पोलीस अंमलदार प्रफुल्ल पोतेकर घटनास्थळी दाखल झाले. उंब्रज पोलिसांच्या मदतीने जेसीबी, ट्रॅक्टर आणि डंपर उपलब्ध करून घेण्यात आले. मुसळधार पावसाची तमा न बाळगता पोलिसांसह जिमनवाडीचे पोलीस पाटील अरुण मोहिते, पोलिस मित्र सागर मगर, श्रीकांत मोरे, डफळवाडीचे माजी सरपंच अशोक सपकाळ आणि ग्रामस्थांनी बस बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.