पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ‘क्रेटा’च्या धडकेत पुणे येथील पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

by Team Satara Today | published on : 09 June 2026


भुईंज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जोशी विहीर गावच्या हद्दीत हॉटेल रायगड इन समोर एक भीषण अपघात झाला. यामध्ये भरधाव जाणाऱ्या ह्युंदाई क्रेटा कारने जोरदार धडक दिल्याने एका ५० वर्षीय पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विशाल गुलाब वाघोले (रा. वडगाव शेरी, ता. हवेली, जि. पुणे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, अपघात घडल्यानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला होता.

​या अपघाताबाबत भुईंज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, विशाल वाघोले हे रविवारी रात्री आठच्या सुमारास महामार्गावरील पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवरून रस्ता ओलांडत होते. याच दरम्यान सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या ह्युंदाई क्रेटा कारने (क्रमांक एमएच-०९-ईजे-९८१०) वाघोले यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की वाघोले यांचा जागीच करुण अंत झाला. अपघातानंतर कारचालकाने थांबणे अपेक्षित असताना त्याने पोलिसांच्या भीतीने घटनास्थळावरून पोबारा केला.

​अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शिवाजीराव तोडरमल यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परता दाखवत फरार झालेल्या संबंधित क्रेटा कारचा शोध लावून ती ताब्यात घेतली. यानंतर मृत वाघोले यांचा मृतदेह भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह अत्यंतिक दुःखात असलेल्या त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.

​दरम्यान, अपघात घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मृत व्यक्तीचा देह महामार्गावरच पडून राहिल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांमध्ये काहीसा असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेले सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काही वेळ प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळत वाहतूक पूर्ववत केली. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवाजीराव तोडरमल करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रेमसंबंधातूनच लक्ष्मण मंडलेंचा खून; कार्व्हेतील प्रियकरासह कराडातील कार चालक गजाआड

संबंधित बातम्या