सातारा : सातारा जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सातारा, कराड, पाटण, वाई व महाबळेश्वर तालुक्यांत मुसळधार पाऊस कोसळत असून खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा व फलटण तालुक्यांत मध्यम पाऊस सुरू आहे.
दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कोयना, कण्हेर, धोम, नीरा व धोम-बलकवडी धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यातील नद्यांच्या प्रवाहात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सातारा शहरात सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला. तसेच शाळा सुटण्याच्या व भरताना पालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने काही ठिकाणी किरकोळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन गारठले असून, पावसाचा जोर आणखी वाढल्यास नद्यांच्या काठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन सतत पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.