दिल्ली : "आज जगभरात तणाव सातत्याने वाढत असून त्याचा सामान्य जनतेच्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे," असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ब्रिक्स' (BRICS) परिषद २०२६ च्या दुसऱ्या दिवशी केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "महामारी, हवामान आपत्ती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांनी हे स्पष्ट केले आहे की, आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात कोणतीही आपत्ती एका क्षेत्रापुरती मर्यादित राहत नाही. म्हणूनच, आम्ही ब्रिक्स गटात कठीण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता (resilience) मजबूत करण्यावर विशेष भर दिला आहे. आव्हानांची वेळेत ओळख पटवणे, त्यांच्यासाठी तयार राहणे आणि त्वरित पावले उचलणे तितकेच गरजेचे आहे. याच विचाराने संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध आणि त्यांच्याशी लढा देण्यासाठी 'ब्रिक्स इंटिग्रेटेड अर्ली वॉर्निंग सिस्टिम'वर सहमती झाली आहे. यासोबतच आपत्ती व्यवस्थापनासाठी 'अर्ली वॉर्निंग डेटा इंटिग्रेशन गाइडलाइन्स' देखील तयार करण्यात आल्या आहेत."
चार स्तंभांवर लक्ष केंद्रित: पंतप्रधान मोदी
"भारताच्या अध्यक्षतेखाली आम्ही आमच्या सर्व प्रयत्नांना लवचिकता , नवोन्मेष , सहकार्य आणि स्थिरता या चार स्तंभांवर केंद्रित केले आहे. मला आनंद आहे की, तुमच्या सहकार्य आणि समर्थनामुळे आम्ही आमचा सामायिक दृष्टिकोन परस्परांना फायदेशीर ठरणाऱ्या सहकार्यात बदलू शकलो आहोत," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
'ग्लोबल साउथ' देशांचा ब्रिक्सवरील विश्वास वाढला
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगू शकतो की, 'ग्लोबल साउथ' देशांचा ब्रिक्सवरील विश्वास वाढला आहे; कारण त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते, त्यांच्या अनुभवांचा आदर केला जातो. त्यांच्यासाठी केवळ उपाययोजनाच केल्या जात नाहीत, तर त्या त्यांच्या सहभागातूनच तयार केल्या जातात. ब्रिक्सची खरी ताकद ही आमच्या विविधतेत आणि परस्पर सहकार्यात दडलेली आहे. आपली पार्श्वभूमी आणि वास्तव भिन्न असू शकते, परंतु सहकार्याच्या बळावर आपण एकत्रितपणे प्रगती करतो आणि मानवतेच्या कल्याणासाठी बहरतो. आपली विविधता हीच आपली ओळख बनून राहो, आपले सहकार्य हीच आपली प्रेरणा ठरो आणि आपल्या प्रगतीचा लाभ संपूर्ण मानवजातीला मिळो," असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.