सातारा : खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाण्याचा दिलासा देण्यासाठी गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा जलसिंचन योजना (जिहे-कटापूर) अंतर्गत नेर उपसा जलसिंचन योजना क्रमांक 3 च्या कामाचा भूमिपूजन सोहळा डिस्कळ-चिंचणी रोड, पांढरवाडी येथे नुकताच उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या प्रारंभामुळे खटावच्या शेतीला सुजलाम् सुफलाम् बनवण्याच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड पार पडला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. केंद्र आणि राज्यातील युती सरकारच्या माध्यमातून खटावचा दुष्काळ हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणि मंजुरी मिळवून देण्यात येत आहे. आमदार महेश शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच रखडलेल्या प्रकल्पांना खरी गती मिळाली असल्याची भावना यावेळी खटाव पंचायत समितीच्या उपसभापती रेश्माताई शेडगे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन रणधीर जाधव व उपस्थित वक्त्यांनी स्पष्ट केली.
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या, मोळ, मांजरवाडीच्या डोंगराळ भागाला हिरवेगार करायचे आहे. याआधीच्या लोकप्रतिनिधींनी या भागाचा वापर केवळ दुष्काळ दाखवण्यासाठीच केला. कोणीही येथील स्थानिकांच्या पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर बागायती करण्याचा आ. महेश शिंदे यांचा मानस आहे. टप्पा क्र. 3 आणि 4 साठी 2600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणार्या विषमुक्त स्वयंपाकघर अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार महेश शिंदे यांनी खटावच्या विकासाचा आणि पाण्याचा निर्धार पुनरुच्चारित केला. ते म्हणाले की, खटाव तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्याचा शब्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि तो शब्द प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. जिहे-कटापूर योजनेचा तिसरा टप्पा आता सुरू झाला असून, लवकरच पुढील चौथ्या टप्प्याचे कामही हाती घेतले जाईल. या योजनेद्वारे मूळ, मांजरवाडी आणि बुध गटातील सर्व गावांना हक्काचे पाणी मिळणार असून, हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. येत्या 12 महिन्यांच्या निश्चित कालावधीत ही योजना पूर्ण करून दाखवू, अशी ठोस ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
याशिवाय आमदार महेश शिंदे यांनी आपल्या राजकीय विरोधकांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, विकासकामांवर टीका करणे हा लोकशाहीचा भाग आहे, परंतु टीका करणार्यांनी स्वतः सत्तेत असताना जनतेसाठी काय केले याचा हिशोबही मांडायला हवा. प्रत्येक निवडणुकीला येथील लोकप्रतिनिधी पाणी दिले नाही तर पुढच्या निवडणुकीत तुमच्यापुढे येणार नाही, असे आश्वासन देत असत. खरेच ते पुढील पाच वर्षे फिरकतच नव्हते. खटावच्या शेतकर्यांसाठी पाणी हा राजकीय मुद्दा नसून त्यांच्या कित्येक वर्षांचे स्वप्न आणि जगण्याचा आधार आहे. हा कार्यक्रम
या योजनेमुळे मूळ, मांजरवाडी आणि बुध परिसरातील शेतीचा कायापालट होणार असल्याने संपूर्ण खटाव तालुक्यातून आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे खटावचा पाण्याचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात सुटण्याच्या मार्गावर आहे.
यावेळी बूधचे माजी उपसभापती लवकुमार मदने, माजी जि. प. सदस्य विठ्ठलराव फडतरे, मांजरवाडी चे ज्येष्ठ नेते रामभाऊ पवार, शिंदेवाडी चे माजी सरपंच तानाजीराव फाळके, राहुल बापू, ललगूणचे हनुमंतराव शिंदे, फडतरवाडी चे नवनाथ तात्या फडतरे, राजापूरचे दशरथ घनवट, नेर चे रामचंद्र चव्हाण, पांगरखेल चे माजी सरपंच प्रल्हाद जगताप, वेटनेचे के. एम. नलवडे, बुध चे शशिकांत घाडगे, अनपटवाडी चे डॉ. आनंदराव भोसले, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, चेअरमन संतोष वाघ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शेडगे, रणसिंग महाराज, वेटनेचे सरपंच महेश नलवडे, गजानन शिंदे, विसापूरचे हरिचंद्र सावंत, बाळासाहेब सावंत, सागर मदने, मंदार माळी, महेश गोडसे, संदीप शिपटे, मयूर कर्णे, प्रशांत पवार, बुधच्या सरपंच सौ. सुजाताताई बोराटे, जलसंधारणाचे सर्व शासकीय अधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला आदी उपस्थित होते.
शेतकर्यांसाठी पाणी म्हणजे स्वप्न आणि जगण्याचा आधार आ. महेश शिंदे यांच्या हस्ते नेर उपसा जलसिंचन योजना क्रमांक 3 च्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा