सातारा : पावसाने उघडीप दिल्याने शुक्रवारी सकाळी हे कोयना धरणाचे दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. आता केवळ पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून कोयना नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी ४ हजार ७४४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा १०५.१४ टीएमसी इतकाअसून त्यापैकी उपयुक्त साठा १००.०२ टीएमसी इतका आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणार्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणाच्या सहापैकी दोन वक्र दरवाजातून सुरू असणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी पायथा वीजगृहात वीज निर्मिती करून प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.
गुरुवार, ३ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता कोयना धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाल्याने हे धरण शंभर टक्के भरले होते. त्याचवेळी पाऊस सुरू होता आणि त्यानंतर पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सहापैकी दोन वक्र दरवाजे एक फुटाने उचलून कोयना नदीत पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला होता. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती.
कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा; पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून पाणी सोडले
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा