सातारा जिल्‍ह्याच्या प्रेमाने भारावून गेले : डॉ. स्मिता जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिली महिला आमदार निवडून आणण्याची संधी मतदारांनी द्यावी

by Team Satara Today | published on : 19 October 2026


सातारा : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी साताऱ्याच्या दोन्ही महाराजांचे आशीर्वाद मिळाले असून, सातारा जिल्‍ह्याच्‍या प्रेमाने मी भारावून गेले आहे. पदवीधर व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याच्या ध्येयाने मी काम करणार आहे. त्‍यांच्‍यासाठी जीवाचे रान करेन. गेली २५ वर्षे मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, तरुणांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पदवीधरांचे प्रश्‍न सोडवण्‍यासाठी मी कटिबद्ध असून मला सातारकरांनी संधी द्यावी, असे भावनिक आवाहन पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्‍या उमेदवार डॉ. स्‍मिता योगेश जाधव यांनी केले.
शेंद्रे येथील शिक्षक, पदवीधर मतदारांच्‍या मेळाव्‍यात बोलताना त्‍या म्‍हणाल्‍या, शैक्षणिक क्षेत्रामध्‍ये डॉ. डी. वाय. पाटील इन्‍स्‍टिट्यूटच्‍या माध्‍यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचाही पदवीधरांच्या प्रश्नांसाठी उपयोग करुन घेणार आहे. पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि पती डॉ. योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दै. ‘पुढारी’च्‍या माध्यमातून लोकांचे प्रश्न प्रभावीपणे कसे मांडायचे आणि व्यवस्थेकडून ते कसे सोडवून घ्यायचे, हे शिकायला मिळाले.
याच अनुभवाच्या आधारे पदवीधरांसाठी कौशल्य विकास केंद्रे, उद्योजकता प्रशिक्षण केंद्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे आणि युवकांसाठी मानसिक स्वास्थ्य केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिली महिला आमदार निवडून आणण्याची संधी मतदारांनी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्‍याला सातारा जिल्‍ह्यातील पदवीधर मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजप उमेदवारांच्या विजयाचा केंद्रबिंदू पाटण ठरणार - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पाटण येथे महायुतीचा जोरदार मेळावा
पुढील बातमी
मायणी-धोंडेवाडीत अवैध गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; एक टन गोमांसासह ९.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या