संविधानाची नैतिकता जोपासण्याची गरज आहे - डॉ. शिवाजीराव पाटील, चंद्रकांत खंडाईत यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

by Team Satara Today | published on : 27 March 2026


सातारा  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या क्रांतीची व भारतीय संविधानाची घटनात्मक नैतिकता जोपासण्याची नितांत गरज आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी कॉलेजचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख  डॉ. शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पुरोगामी विचार व चळवळीतील मौलिक योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता सतरावा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष लढवय्ये  कार्यकर्ते चंद्रकांत खंडाईत  यांना डॉ.शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर  झिंब्रे होते. विचारमंचावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते   अ‍ॅड.कॉम्रेड सयाजीराव पाटील, संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष  रमेश इंजे, उपाध्यक्ष प्रा.प्रशांत साळवे,सहकार्यवाह  डॉ.सुवर्ण यादव उपस्थित होते.या सोहळ्यात कॉम्रेड सयाजीराव पाटील यांनी पुरस्काराचे मानकरी चंद्रकांत खंडाईत यांचा पाच हजार रुपये रोख व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

डॉ. शिवाजीराव पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांस्कृतिक परिवर्तनाचे राजकारण केले. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, बौद्ध धम्माचा स्वीकार  व भारतीय संविधानाची निर्मिती हे  त्यांच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या क्रांतीचे महत्वाचे घटक आहेत. त्यांनी दिलेली  समतेच्या विचाराची स्पष्ट वैचारिक चौकट व दिशा  जोपासण्याची गरज आहे. त्यांचा व्यक्तिपूजा व अंधभक्तीला  तीव्र विरोध होता. कारण त्यामुळे  देशात हुकूमशाही निर्माण होण्याचा धोका आहे. 

कॉम्रेड सयाजीराव पाटील म्हणाले, देशाला प्रतिगामी धर्मांध, जातीयवादाचा   कॅन्सर झाला आहे.  त्याचा बीमोड  करण्यासाठी सर्व जाती, धर्मातील लोकांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे.

चंद्रकांत खंडाईत यांनी सत्काराला उत्तर देताना या पुरस्काराने लढण्यासाठी अधिक बळ मिळाले अशी भावना व्यक्त केली.

दिनकर झिंब्रे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, समाज परिवर्तनाचे काम करताना   फुले -आंबेडकरवादाची स्पष्ट वैचारिक व सैदांतिक भूमिका जोपासण्याची गरज आहे.

आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त अधिकारी संबोधी  प्रतिष्ठानचे आजीव  सभासद भास्कर फाळके यांनी संस्थेला भरघोस आर्थिक मदत दिल्याबद्दल अध्यक्ष रमेश इंजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्काराचे मानकरी चंद्रकांत खंडाईत यांचा शाहीर प्रकाश फरांदे व संजय करपे यांनीही याप्रसंगी सत्कार केला. प्रारंभी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ.जनार्दन वाघमारे व प्राचार्य मा.के.यादव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे यांनी आभार मानले. संबोधी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, सभासद, कॅप्टन बनसोडे यांच्या पत्नी यमुनाताई बनसोडे, चंद्रकांत खंडाईत यांच्या पत्नी पंचशीला यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर श्रोते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बारामती हादरली ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला कारखाली चिरडून मारले
पुढील बातमी
कार चार वेळा पलटी होऊन झालेल्या अपघातात साताऱ्यातील आजोबा व नातीचा मृत्यू; धुळदेव येथील घटना; एक जण गंभीर जखमी, चौघे किरकोळ जखमी

संबंधित बातम्या