सातारा : भारत विकास परिषदेच्यावतीने 46 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव मिळाल्याने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, जिद्द निर्माण होऊन ते यशस्वी जीवन जगू शकणार आहेत. परिषदेच्या या उपक्रमाने दिव्यांगांना नव्या दिशा, उमेद व संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन क्रांतीसिह नाना पाटील सर्वौपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.युवराज करपे यांनी केले.
भारत विकास परिषद, पुणे दक्षिण,पिंपरी-चिंचवड व सातारा शाखा आयोजित ४६ दिव्यांगांना अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम मोफत हात व पाय प्रदान समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. करपे, बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.चेतना माजगावकर होत्या. कार्यक्रमास सातारा शाखेचे अध्यक्ष सीमा दाते, भारत विकास परिषदेच्या विविध शाखंचे पदाधिकारी उपस्थित होते.
46 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव मिळाल्याने दिव्यांगामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन पुढे जाण्याच्या संधी निर्माण होणार असल्याचे सांगून डॉ. करपे म्हणाले, असून भारत विकास परिषदेचा हा उपक्रम दिव्यांगांच्या जीवनात सुख निर्माण करणारा दीपस्तंभ ठरेल.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.चेतना माजगावकर म्हणाल्या की, दिव्यांगांना केवळ कृत्रिम पाय व हात मिळणार नसून त्यांना मोठा आनंद व आधार मिळणार असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गायनाने झाली.त्यानंतर भारत माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षास जलधारा अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. सातारा शाखा अध्यक्षा सीमा दाते यांनी प्रास्ताविकात सातारा शाखेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात ४६ दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रदान समारंभ संपन्न होत आहे. याचा आम्हाला आनंद होत आहे.तसेच शाखेच्या वतीने सामाजिक विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत, असे म्हणाल्या. भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय सेवा आयाम प्रमुख श्री. शशीकांत पदमवार यांनी भारत विकास परिषदेची स्थापना, इतिहास व विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वआधार केंद्र पुणे प्रमुख,जयंत जेस्ते यांनी कृत्रिम अवयव यांचा वापर करताना दिव्यांगांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती सांगितली. सुत्रसंचलन किशोर देशपांडे व आभार डॉ.सुधीर जोशी यांनी मानले.राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप संपन्न झाला.