कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान जनजागृतीचा एक भाग म्हणून "लोकशाहीत मतदानाचे महत्त्व" या विषयावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती जनजागृती पथकाद्वारे देण्यात आली. निबंध, काव्यलेखन, रांगोळी स्पर्धांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी तसेच मोठ्या गटातून विविध प्रवेशिका जनजागृती पथकाला प्राप्त झाल्या. निबंध स्पर्धेमध्ये उंब्रज येथील विद्या उकिर्डे विजेत्या ठरल्या. सातारा येथील सरिता व्यवहारे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. तर काव्य स्पर्धेत लोणंद येथील संतोष राऊत विजेते ठरले. सातारा येथील सुरेखा कुलकर्णी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. रांगोळी स्पर्धेला देखील दीपावलीच्या आणि निवडणुकीच्या विशेष पार्श्वभूमीवर चांगला प्रतिसाद मिळाला.
यामध्ये वाई येथील नंदिनी जमदाडे आणि निर्मिती जमदाडे विजयी ठरल्या. शालेय गटामध्ये आरोही मोहिते, शरण्या शिर्के निबंध स्पर्धेत विजेत्या ठरल्या. तर पंकजा बागाव या विद्यार्थिनीने कविता स्पर्धेत पारितोषिक पटकावले आहे. या तीनही विद्यार्थिनी कोरेगाव येथील सुभाषनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. मतदान जनजागृतीसाठी रॅली, स्पर्धा, पथनाट्य व्याख्याने इत्यादी विविध पद्धतीने जनजागृती करण्यात आली. याला नागरिकांनी शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. या प्रयत्नांचाच भाग म्हणून या स्पर्धा जाहीर करण्यात आल्या होत्या.. या स्पर्धांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीबाबत विचारमंथन व्हावे असा हेतू होता. पारितोषिक वितरण लवकरच आयोजित केले जात आहे. या स्पर्धांना प्रतिसाद दिल्याबाबत जनजागृती पथकाने नागरिकांचे आभार मानले आहेत.