सातारा : शहरात मुलींचे वस्तीगृह चालविणाऱ्या तक्रारदारास मुलीस ऍडमिशन का दिले अशी विचारणा करत शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जमीर गणी सय्यद (वय ५० रा. मल्हारपेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनिल उर्फ पपु बडेकर (रा. ढोरगल्ली, मल्हारपेठ, सातारा) याच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुलींचे वस्तीगृह चालवित असून दि.६ फेब्रुवारी २०२५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान अनिल बडेकर यांनी वस्तीगृहात येऊन कावेरी कदम (रा. सदरबझार, सातारा) हिला प्रवेश कसा दिला, असा जाब विचारला. तसेच संबंधित मुलगी सध्या कोठे आहे याबाबतही त्यांनी विचारणा केली.
यावेळी वाद वाढत गेल्याने बडेकर यांनी सय्यद यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी अनिल बडेकर यांच्या विरोधात कलम ३५१(२)३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहे.